esakal | Kokan Rain Update : अस्मानी संकटाचा शेतीला फटका ; वादळ सरताच पाऊस ओसरला
sakal

बोलून बातमी शोधा

kokan rain update As soon as the storm started  the rain stopped

पावसामुळे लांजा-दाभोळे-कुरचुंब ओढ्याला पूर आल्यामुळे वाहतूक खंडित झाली

 

Kokan Rain Update : अस्मानी संकटाचा शेतीला फटका ; वादळ सरताच पाऊस ओसरला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ अरबी समुद्राकडे जसजसे सरकत गेले तसे रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवान वार्‍यासह पावसाचा जोर गुरुवारी (ता. 15) सायंकाळी ओसरला. राजापूरची अर्जुना तर रत्नागिरीत काजळी नदीला पूर आला होता. अस्मानी संकटाचा सर्वाधिक तडाखा शेतीला बसला असून टक्के भातशेती हातची जाण्याची शक्यता आहे.


जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासात सरासरी 41.58 मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड 9.20, दापोली 18.40, खेड 88.40, गुहागर 46.10, चिपळूण 29.20, संगमेश्वर 55.80, रत्नागिरी 56.30, लांजा 48, राजापूर 22.80 मिमी नोंद झाली.


बुधवारपासून पावसाचा जोर सुरू होता. सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे राजापूर ते मंडणगडपर्यंत सगळीकडे तडाखा बसला. राजापूर, लांजा, रत्नागिरीसह संगमेश्‍वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात भातशेतीचे 68 हजार हेक्टर तर नाचणीचे 9 हजार हेक्टर क्षेत्र आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे कापणी रखडली. लोंबी आल्यानंतर पिकांची मूळं कमकुवत होतात. त्यावर पाऊस पडल्यामुळे उभी पिके मळ्यातच आडवी झाली आहेत.

48 तासाहून अधिक काळ भात पाण्यात राहिल्यामुळे लोंब्यांना फुटवे येऊ लागले आहेत. पावसाच्या पाण्याबरोबर हरचिरीत एका शेतकर्‍यांचे 18 भारे तर राजापूर उन्हाळे येथे अनेक वाहून गेले. गेले तीन महिने जपलेली शेती डोळ्यादेखत वाहून जात असल्याचे पाहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत.


पावसामुळे लांजा-दाभोळे-कुरचुंब ओढ्याला पूर आल्यामुळे वाहतूक खंडित झाली. रत्नागिरी तालुक्यात काजळीच्या पुरामुळे चांदेराईसह हरचिरी, चिंद्रवली, पोमेंडी, सोमेश्‍वर गावे बाधित झाली. तसेच संगमेश्‍वर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगडातही पावसाचा जोर होता. राजापूर चिखलगावातील 5 घरे, 5 गोठे व एका दुकानाचे, धोपेश्वरमधील एक घर, एक गोठाचे, रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील एका घराचे 30 हजाराचे, फणसोप येथील घराचे 1500 रुपये, मालगुंड येथील घराचे 21 हजाराचे नुकसान झाले तसेच वेळवंड-बावनदी रस्त्यावर दरड कोसळून एकेरी वाहतूक सुरू आहे.

हेही वाचा- सिंधुदुर्गातील  तो हादरा भूकंपाचाच -

पावसामुळे रस्ते खचले

खेड पन्हाळजे येथील रस्ता पावसामुळे खचला असून, वाहतूक एकेरी सुरू आहे. चिपळूण चिंचघर कोरोगाव-भैरवली रस्ता खचला असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दाभिळ सातीवगाव आयनी रस्ता पावसाच्या पाण्यामुळे खराब झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्‍वरला आंबेड, तळेकांटे, बावनदीजवळ दरड कोसळली. चिपळूण चिंचघर कोरोगाव-भैरवली रस्ता पावसामुळे खचला तर दाभिळ सातीवगाव आयनी रस्त्यावर पावसामुळे पाणी आल्यामुळे रस्ता खराब झाला आहे.

संपादन - अर्चना बनगे