esakal | रिफायनरी समर्थनार्थ महिलांचा एल्गार
sakal

बोलून बातमी शोधा

रिफायनरी समर्थनार्थ महिलांचा एल्गार

रिफायनरी समर्थनार्थ महिलांचा एल्गार

sakal_logo
By
राजेंद्र बाईत - सकाळ वृत्तसेवा

राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला तालुकावासियांकडून जोरदार समर्थन मिळत असताना आज नाटे आणि धोपेश्‍वर येथे शेकडोंच्या संख्येने गोळा झालेल्या महिलांनी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ एल्गार पुकारला. कोण म्हणतोय रिफायनरी होणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही, राजापुरात रिफायनरी झालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला.

तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला जोरदार समर्थन मिळत आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक असलेला आणि रोजगारांसह स्थानिक पातळीवर विविध उद्योग व्यवसायांना चालना देणार्‍या रिफायनरी प्रकल्पाची तालुक्यामध्ये उभारणी करावी अशी मागणी लोकांकडून केली जात आहे. यामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारणीसाठी बारसू-गोवळ परिसरातील जागेचा पर्याय पुढे आला. ग्रामस्थांसह जमिन मालकही त्यासाठी आग्रही आहेत. त्याच्यातून आज नाटे राजवाडी, तर धोपेश्‍वर येथे महिलांनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या.

नाटे येथे प्रकल्प समर्थनार्थ पुकारलेल्या एल्गारावेळी देवाचेगोठणे दशक्रोशी रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील राणे, शिवसेनेचे विद्यमान उपविभागप्रमुख संतोष चव्हाण, शाखाप्रमुख महेश कोठारकर, चंद्रकांत मिराशी, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि बचत गटांच्या प्रतिनिधी मनाली करंजवकर, ग्रामपंचायत सदस्य श्रुतिका बांदकर, सुबोध आंबोळकर, शिवसेना युवासेना शाखाप्रमुख सचिन बांदकर, माजी सरपंच संजय बांदकर, नाटे, राजवाडी येथील महिला उपस्थित होत्या.

हेही वाचा: एकाच कुटुंबातील पाच मुलं बुडाले; राजस्थानमधील हृदयद्रावक घटना

धोपेश्वर गावातील महिलांनी एकत्र येत प्रकल्पाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. महिलांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, गावातील बचतगटांच्या हाताला काम मिळावे आणि नोकरीधंद्यासाठी गाव सोडून मुंबईला जाणार्‍या आमच्या मुलांना याच ठिकाणी रोजगार मिळावा यासाठी रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, अशा भावना व्यक्त करताना रिफायनरी विरोधात अपप्रचार करणार्‍या एनजीओंना चले जावचा इशारा या महिलांनी दिला.

loading image
go to top