दलित संघटनांचा रत्नागिरीत तीन ठिकाणी रास्ता रोको

राजेश शेळके
बुधवार, 3 जानेवारी 2018

रत्नागिरी - भीमा कोरेगाव दंगलीचे तीव्र पडसाद आज शहरात उमटले. दंगलीच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी शहरात जयस्तंभ, बस स्थानक आणि जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको केला. यामुळे सुमारे साडेतीन तास वाहतूक कोंडी झाली.

रत्नागिरी - भीमा कोरेगाव दंगलीचे तीव्र पडसाद आज शहरात उमटले. दंगलीच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी शहरात जयस्तंभ, बस स्थानक आणि जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको केला. यामुळे सुमारे साडेतीन तास वाहतूक कोंडी झाली.

घोषणा देत मोर्चा जयस्तंभावरून बस स्थानकापर्यंत आला. रस्त्याच्या कडेचे स्टॉल, टपऱ्या, दुकाने जबरदस्तीने बंद पाडली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकमत न राहिल्याने आंदोलनकर्त्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. आंदोलनकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे जिल्हा रुग्णालयासमोर अखेर पोलिसांनी धरपकडीची तयारी सुरू केली. त्यानंतर नरमलेल्या आंदोलकांनी काढता पाय घेतला. 

शहरात सकाळी भीमा कोरेगाव दंगलीच्या विरोधात पुकारलेल्या बंदचे पडसाद दिसत नव्हते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रत्नागिरी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रत्नागिरी (ए), भारिप बहुजन महासंघ, भारत मुक्ती पार्टी, भारतीय बौद्ध महासभा, बसप, तानाजी कुळये आदी दलित संघटना सकाळी साडेअकरानंतर गोळा झाल्या. जयस्तंभ येथे सर्व जमा झाले.

तेथे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. ...हा आवाज कोणाचा, जय भीमवाल्यांचा. बंद करा बंद बाजापेठ बंद करा, शटर खाली, झालेच पाहिजे, भाजप शासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. शाळा, कॉलेजना सुट्या देण्यात आल्याने जमाव वाढत गेला. तरुण या आंदोलनात सामील झाले. त्यामुळे नेत्यांच्या हातातून हे आंदोलन निसटत होते.

रास्ता रोको केल्यानंतर जमावाने शहराकडे जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी जयस्तंभ भागातच आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. त्याचे उल्लंघन करीत जमाव बस स्थानक दिशेकडे निघाला. केळी, फळ विक्रेते, स्टॉलधारक, टपरीधारक आदींना जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडले.

बस स्थानकासमोरील दुकानेही बंद पाडण्यात आली. जमाव राम आळीत जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांच्या हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अधिक पोलिस कुमक मागवली. शीघ्र कृतीदल, सीआरपीएफ आदी तुकड्या मागविण्यात आल्या.

उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी, वाहतूक पोलिस निरीक्षक ए. ए. खान, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिरीष सासने आदींनी आंदोलनकर्त्यांना तेथेच रोखले. त्यामुळे बाजारपेठेत दुकाने बंद पाडण्याच्या मुद्दयावरून होणारा वाद टळला. जमाव तेथून मागे फिरला. वाटेत येणारी दुकाने, टपऱ्या पुन्हा बंद पाडल्या.

त्यानंतर आंदोलन मागे घेतले जाईल, अशी पोलिसांची अपेक्षा होती. परंतु तरुण आंदोलकांनी मारुती मंदिरला जाण्याचा अट्टहास धरला. पोलिसांनी त्याला रोखले. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलकामध्येच वादावादी सुरू झाली. नेतेमंडळींनी आंदोलन विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. तरुणांनी त्याला विरोध केला. आपापसातील वादात जिल्हा रुग्णालयासमोर पावणेतीनपर्यंत हे नाट्य सुरू होते. पोलिसांचीही सहनशक्ती संपली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या दृष्टीने रचना करण्यास सुरवात केली. त्या आधीच नेतेमंडळींनी काढता पाय घेतला होता. त्यामुळे अखेर आंदोलनाला नेतृत्वच राहिले नाही. 

...अन्यथा प्रक्षोभक आंदोलन करू

भीमा कोरेगाव येते जातीयवाद्यांनी नियोजनबद्ध दंगल घडवली. विजयस्तंभाला अभिवादन करून परतणाऱ्या महिला, मुले व कार्यकर्त्यांवर अमानुष दगडफेक केली. निष्पाप व निःशस्त्र माणसांवरचा हा भ्याड हल्ला माणुसकीला लाजविणारा आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडून पडल्याचे हे लक्षण आहे. या दंगलीचा आम्ही निषेध करतो. दंगलखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत. या बाबत तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा आम्ही प्रक्षोभक आंदोलन करण्याचा इशारा देतो, असे निवेदन संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

आंदोलकांप्रती पोलिस मवाळ

जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना आणि आंदोलनाला दिलेली मर्यादित परवानगी उल्लंघून आंदोलन होत होते. तरी पोलिसांची जमावाप्रती अधिकच मवाळ भूमिका दिसत होती. त्यामुळे आंदोलक एकएक पायरी पुढे जात होते. अखेर आंदोलन नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांनी धरपकडीचा निर्णय घेतला तेव्हा ते नियंत्रणात आले. हीच भूमिका पोलिसांनी आधी घेतली असती तर आंदोलन एवढे लांबले नसते. 

Web Title: Kolhapur News Koregaon Bhima Riots ratnagiri agitation