माजी आमदार निशिकांत ऊर्फ नाना जोशी कालवश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

चिपळूण : साहित्य, कला, पत्रकारिता आणि राजकारणात लीलया संचार करणारे चिपळूणच्या वशिष्ठी तीराचे ऋषीतुल्य व माजी आमदार निशिकांत ऊर्फ नाना जोशी (वय 78) यांचे आज निधन झाले. यकृताचा आजार आणि काविळीमुळे ते आजारी होते. डेरवण रुग्णालयातून चार दिवसांपूर्वी उपचार घेऊन ते घरी परतले होते. आज दुपारी 3.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (ता. 4) सकाळी 11 वाजता चिपळूण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

परशुराम (ता. चिपळूण) गावी त्यांचा जन्म झाला. शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुंबईच्या चिकित्सक हायस्कूलमध्ये माध्यमिकचे, तर रुईया कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. मुंबईत नोकरी करत असताना सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये त्यांनी वकिलीची पदवी मिळविली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करीत असतानाच 1965 मध्ये त्यांनी 'सागर' हे दैनिक सुरू केले. सह्याद्री वाहिनीच्या 'रत्नदर्पण' या पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. 1985 मध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. (कै.) गोविंदराव निकम आणि विद्यमान केंद्रीय ऊर्जामंत्री अनंत गीते यांच्या विरोधात त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक, महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजना कार्यकारिणीवर सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. राज्य सरकारच्या कोकण सिंचन अभ्यास मंडळावर काम करताना दहा खंडाचा अहवाल त्यांनी तयार केला होता. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांबरोबर नाना जोशी यांचे मैत्रीचे संबंध होते. नाना आजारी असल्याचे समजल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी शरद पवार आज सायंकाळी 7 वाजता चिपळूणला येणार होते. तत्पूर्वी, दुपारी नानांचे निधन झाले.

Web Title: Kolhapur news ratnagiri news kokan news Nishikant Joshi