esakal | गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? चाकरमान्यांनो तुमच्यावर असणार करडी नजर
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? चाकरमान्यांवर प्रशासनाची करडी नजर

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : गणेशोत्सवात येणार्‍या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा विस्फोट होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून गावात येणार्‍या चाकरमान्यांवर ग्रामकृतीदल आणि आरोग्य कर्मचार्‍यांची नजर राहणार आहे. जिल्ह्यातील चार इंट्रीपॉईटवर कोरोना तपासणीची व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

कोकणात रेल्वे, एसटी व खासगी गाड्यांमधून मोठ्याप्रमाणात चाकरमानी गावी येणार आहेत. या पार्श्‍वभुमीवर कोरोना तपासणीसंदर्भात दोन दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची बैठक घेतली होती. त्यामध्ये महत्त्वाच्या सुचनाही दिल्या. जिल्ह्यात प्रत्येक चेकपोस्टवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंडप बांधण्यात येणार आहेत. त्यात सर्व विभागाच्या कर्मचार्‍यांची पथके उपस्थित राहतील. महत्वाची बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांवर आरोग्य विभागाची पथके कार्यरत राहतील.

परजिल्ह्यातून गावात, वाडीत येणार्‍यांची कोरोना चाचणी करुन घेण्यास प्रवृत्त करण्याची जबाबदारी ग्राम कृतीदलाकडे दिली आहे. बाधित आल्यास संबंधिताला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल. चाकरमान्यांची यादी तयार करुन लक्षणे असलेल्या व्यक्तीची माहिती तात्काळ आरोग्य विभागाला कळवण्याच्या सुचना दिल्या आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, घरगुती-सांस्कृतिक कार्यक्रमाला गर्दी होणार नाही, याची दक्षता ग्रामकृती दलाकडे देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी कशेडी, मुर्शी, कुंभार्ली , खारेपाटण ही प्रामुख्याने चार ठिकाणे आहेत. तेथे आरोग्य पथकाने प्रथमोपचार किट ठेवावे. कोरोना तपासणीच्या अनुशंगाने अद्ययावत सोयीसुविधांसह उपस्थित रहावे. विलगीकरण कक्ष गावातच तयार केले जाणार आहेत, त्यासाठी तहसिलदार व गटविकास अधिकारी मार्गदर्शन करतील. ऐच्छिक प्रवाशांसाठी पेड तपासणी सुविधा ठेवण्यात येणार आहे. तपासणी पथकाच्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यातील प्रवेशद्वार निहाय दर दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रवाशांची माहिती एकत्रित केली जाईल. त्यात खासगी प्रवासी बसेस, एसटीबसमधून प्रवास करणार्‍यांच्या नोंदी असतील. नाव, संपर्क क्रमांक, प्रवासाचे ठिकाण, नातेवाईकांचा संपर्क क्रमांक, डोस घेतले किंवा नाही, 72 तास आधी चाचणी केली किंवा नाही याचा समावेश असेल. एसटी विभागाकडून ती माहिती तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी यांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे दर तिन तासांनी पाठवण्यात येईल. तालुकास्तरावरुन ती ग्रामकृती दलांकडे जाईल. त्याद्वारे ग्रामकृतीदल गावात आलेल्या प्रवाशांची तपासणी किंवा चाचणी करण्यास प्रवृत्त करतील. लक्षणे आढळल्यास त्यास संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा: अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील वाशीष्टी पुलावरील वाहतूक सुरू

अपघात प्रवण क्षेत्रात मदतीसाठी आरोग्य विभागामार्फत रुग्णवाहिका ठेवाव्यात. पथकाच्या ठिकाणी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रानी औषधसाठा उपलब्धतेबाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी रुग्णवाहिका क्रमांक, वाहन चालकाचे नाव व संपर्क क्रमांक, पर्यायी नंबर, संबधित अधिकार्‍याचे नांव व नंबर प्रसिध्द केले जाणार आहेत.

loading image
go to top