देशात आणखी एकदा क्रांती हवी; स्वातंत्र्यसैनिकाची भावना

देशात आणखी एकदा क्रांती हवी; स्वातंत्र्यसैनिकाची भावना

तळेरे - देशात सर्वसामान्य जनता लुबाडली जात आहे. आता पुन्हा एकदा क्रांतीची गरज आहे. हे उद्‌गार आहेत स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या देवगड तालुक्‍यातील पाटगावचे अनंत गुरव यांचे...

१९५४ चा दादरा नगर हवेली आंदोलन व १९५५ चे बांदा पत्रादेवी आंदोलन (गोवा मुक्ती संग्राम), स्वातंत्र्यावेळी अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करणारी दोन महत्वाचे सत्याग्रह, या दोन्ही आंदोलनात सहभागी झालेले, त्यात बंदुकीची गोळी लागून जखमी झालेले स्वातंत्र्यसैनिक म्हणजे अनंत गुरव. गेली अनेक वर्षे ते स्वातंत्र्यसैनिकांच्या न्याय्य हक्कासाठी लढत आहेत. या प्रशासनाचा गलथान कारभार पाहून अक्षरश: पोटतिडकीने ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यापूर्वी काळी परकीय सत्तेच्या विरोधात अनेकांनी लढा दिला; मात्र त्यानंतरची शासनाची अवस्था, कारभार पाहिला असता, असे निदर्शनास येते की, पुन्हा एकदा जनतेसाठी देशांतर्गत क्रांती होणे अत्यंत आवश्‍यक आहे. जनता अक्षरश: लुबाडली जात आहे. प्रशासनात फार फार तृती दिसून येतात. स्वातंत्र्यसैनिकांची तर अवस्था अत्यंत दयनीय असून भविषयात स्वातंत्र्यसैनिकांपासून हे राजकीय पुढारी मुक्त झालेले दिसतील. असे सांगतानाच देशाच्या तरुणाईला देश सांभाळण्याची साद घालतात. वयाची ८५ संपलेली असली तरीदेखील आजही ते संपूर्ण गावात दररोज फेरफटका मारतात. सुमारे २५ किमी अंतरावरून कामानिमित्त ते तरळ्याला येतात. अखिल भारतीय स्वातंत्र्य सेनानी संग्राम समिती, शाखा महाराष्ट्राचे ते सहसेक्रेटरी असल्यामुळे ते सातत्याने मुंबई, दिल्ली प्रवास करतात. जुन्या आठवणी सांगतानाच होऊन गेलेल्या प्रशासानाबाबतही नाराजी व्यक्त करतात. आजच्या तरुणाईला त्यांच्याकडून खूप काही अनुभवता येईल, एवढा अनुभव आणि अभ्यास त्यांच्याकडे असलेला दिसून येतो. 

श्री. गुरव म्हणाले, ‘‘१९५४ चे दादरा नगर हवेली व १९५५ चे बांदा पत्रादेवी या दोनही सत्याग्रहात मी सहभाग घेतला. चौथी पास झालो आणि मुंबईला गेलो. पोटापाण्याची व्यवस्था करणे त्यावेळी महत्वाचे होते. ताडदेवला त्यावेळी रहायला होतो आणि मित्रांच्या संगतीने समाजवादी ग्रुपमध्ये भाग घेतला. १९५४ ला दादरा नगर हवेली स्वातंत्र्यसैनिकांनी सर केले. ऑगस्ट महिन्यातील पावसाळ्याचे दिवस असतील. यावेळी मुंबईवरून गेलेल्या तुकडीत मी होतो. तर कळवा माहिमवरून २५० जणांच्या तुकडीने प्रवेश केला. तसेच, पालघरमार्गे सुमारे अडीज हजार स्वातंत्र्यसैनिकांनी प्रवेश केला. तिथे एका पोलीस पाटीलवर गोळीबार केला. आम्ही बिनहत्यारी असलो तरीदेखील माझ्यासोबत असलेले तानाजी रावराणे व खातू यांच्याकडे बंदुका होत्या. त्यावेळच्या त्या गोळीबारात पोलीस पाटील मारला गेला आणि पोर्तुगीज व आफ्रिकन सैनिक तिथून पळून गेले आणि ते आम्ही सर केले. त्यावेळीहि माझ्या डाव्या हाताला गोळी लागली. १९५५ च्या आंदोलनात पंजाबवरून आलेल्या तुकडीमध्ये बालविधवा असलेली सौदरा रॉय होत्या. तिच्या हातात झेंडा असताना तीन गोळ्या लागल्या. तो झेंडा जमिनीवर पडू नये म्हणून मी पुढे सरसावलो असता माझ्या डाव्या पायाला गोळी लागली; मात्र झेंडा खाली पडू दिला नाही. या स्वातंत्र्यलढ्यात मी आणि माझे वडील लक्ष्मण अंतू गुरव असे आम्ही बाप बेटे दोघेही सहभागी झालो. माझे वडील लक्ष्मन अंतू गुरव हे आझाद हिंद सेनेत संदेशवाहक होते. फातिमा जीना यांनी त्यांना त्यावेळी कोल्हापूरमार्गे घेऊन गेले आणि आझाद हिंद सेनेत दाखल झाले.  मणिपुरमार्गे कराचीला संदेश पोचवत असताना पकडले गेले. त्यावेळी त्यांनी तो संदेश खाल्ला व आगगाडीतून प्रवास करताना उडी मारली. त्यापासून ते बेपत्ता झाले. मुंबईला बटाट्याची चाळ येथे आमच्या दोन खोल्या होत्या. आमचे वडील भूमिगत झाल्यानंतर ब्रिटीशांनी तिथे हवालदार बसवून त्या ताब्यात घेतल्या.’’

त्यावेळी माझ्यासोबत तानाजी रावराणे, डॉ. म्हसकरन्स, लॉरेन्स डिसोझा, खातू, दळवी, नवनीतलाल माणिकलाल दवे (सुरत) यांच्यासह असंख्य स्वातंत्र्यसैनिक होते. १९३२ च्या स्वातंत्र्यलढ्यात बरबाद झालेले अनेक लोक आमच्याच गावचे आहेत. गुणाजी गोविंद गुरव, भानू बाबू गुरव, विश्राम पुनाजी नाटेकर, भिकाजी गुरव, लक्ष्मन बापू बाणे यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्यामुळे नोकरी गमवावी लागली. १९५२-५३ मध्ये अखंड रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होण्यासाठी पहिला अर्ज मी आणि मनोहर दत्तात्रय माणगावकर यांनी त्यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनाकडे दिला. त्या अर्जाला तत्कालीन नियोजन मंडळाचे सदस्य शामराव पेजे व इस्माईल नाईक यांनी संमती म्हणून त्यावर स्वाक्षर्याही केल्या होत्या.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com