आंबोलीच्या पर्यटनास बदनामीचे गालबोट !

अनिल चव्हाण
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

आंबोली-कावळेसाद येथे दारूच्या नशेत दोघे तरुण दरीत कोसळल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्र थरारला. वर्षा पर्यटन हा आंबोलीतील सर्वांत मोठा पर्यटन हंगाम; पण गेल्या काही वर्षांत नशा आणि नशेबाज पर्यटकांमुळे आंबोलीचे पर्यटन बदनाम होत आहे. या घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आंबोलीचे पर्यटन फुलवायचे असेल तर दारूच्या मुक्त संचाराला वेसण घालणे आवश्‍यक आहे.

आंबोलीचे पर्यटन
आंबोली हे सिंधुदुर्गातील एकमेव हिल स्टेशन. ब्रिटिशांनी या स्थळाला सुटीच्या काळात विरंगुळ्याचे स्थळ म्हणून विकसित केले होते. येथे पर्यटनाचे वारे १९९५-९६ च्या सुमारास वाहू लागले. सुरुवातीला मुंबई, पुणे आणि पावसाळ्यात गोव्यातील पर्यटक यायचे. लांबचे पर्यटक असल्याने त्यांची भोजनाची, निवासाची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्याची गरज निर्माण झाली. यातून स्थानिकांचा पर्यटन व्यवसाय वाढू लागला. या काळात वर्षा पर्यटन ही संकल्पना फारशी प्रचलित नव्हती.

वर्षा पर्यटनाचा ट्रेंड
२००२ नंतर खऱ्या अर्थाने वर्षा पर्यटन मूळ धरू लागले. सुरुवातीला गोव्यातील पर्यटक येथे जास्त प्रमाणात यायचे. गोव्यात पावसाळ्यात पर्यटन हंगाम थंडावलेला असतो. येथे वर्षा पर्यटनासाठी मर्यादित ठिकाणे आहेत. त्यामुळे एका दिवसात जाता येणारे ठिकाण असलेल्या आंबोलीत ‘गोयकरां’ची गर्दी होऊ लागली. हळूहळू या गर्दीत पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह कर्नाटकमधील बेळगाव, बैलहोंगल येथील पर्यटकही येऊ लागले. सुटीच्या दिवशी येथे हजारोंचा जमाव जमू लागला.

संकल्पना बदलल्या
पर्यटनाचा स्थानिकांना फायदा होण्यासाठी कुटुंबवत्सल पर्यटक येण्याची गरज असते. कारण ते स्थानिक पातळीवर निवास, भोजन व इतर खरेदीला प्राधान्य देतात. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते. सुरुवातीला येथे कुटुंबवत्सल पर्यटक यायचे. २००४ नंतर मात्र नशेबाज पर्यटकांच्या झुंडी आंबोलीत धडकू लागल्या. भर रस्त्यात अर्धनग्न होऊन धिंगाणा, धबधब्याच्या ठिकाणी नशेबाजांचा मुक्त संचार, मारामाऱ्या असे प्रकार नियमित झाले. पोलिसांनी कितीही नियंत्रणाचा प्रयत्न केला तरी या झुंडीवर काबू ठेवण्याला मर्यादा येऊ लागल्या. आजही ही परिस्थिती कायम आहे.

उलाढालीवरही परिणाम
नशेबाजांची संख्या वाढू लागल्याने कुटुंबवत्सल पर्यटकांची संख्या कमी होऊ लागली. वर्षा पर्यटनाची गर्दी वाढती दिसली तरी त्याचा स्थानिक पर्यटनाला मर्यादितच उपयोग होऊ लागला. पर्यटन स्थळाच्या ठिकाणीच अनेकजण मुक्तपणे नशापाणी करतात. सोबतचा प्लास्टिकचा कचरा या पर्यटन स्थळावर फेकून देतात. त्यांच्या अतिउत्साहीपणामुळे कुटुंबासोबत आलेल्यांना त्रास सहन करावा लागतो. कुटुंबवत्सल पर्यटक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जेवण घेणे पसंत करतात; पण नशेबाजांमुळे कुटुंबवत्सल पर्यटक वर्षा पर्यटनात आंबोलीपासून दूर राहू लागला. एकीकडे वर्षा पर्यटनात गर्दी दिसायची; पण दुसरीकडे पर्यटन उलाढालीवर मात्र फारसा परिणाम दिसत नसल्याचे चित्र आंबोलीत आहे.

हिडीस प्रकारांना जोर
नशेबाज पर्यटकांकडून अतिउत्साहाच्या भरात नको ते स्टंट करण्याचा प्रकार सर्रास दिसतो. कावळेसादसह घाटातील इतर पॉईंटवरील रेलिंगवर चढून केले जाणारे स्टंट अनेकांच्या जीवावर बेततात. रस्त्यात गाड्या थांबवून कपडे काढून नाचण्याचे प्रकार घडतात. त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. हा धिंगाणा घालणारे गटागटाने असल्याने एक-दोन पोलिसांना त्यांना आवरणे कठीण बनते. शनिवार-रविवारी येथे जास्त पोलिस बंदोबस्त असतो. इतर दिवशी मात्र पोलिसांची संख्या मर्यादितच असते. त्यामुळे फारसा उपयोग होत नाही.

धोक्‍याला निमंत्रण
आंबोलीत वर्षा पर्यटन क्षेत्र मुख्य धबधब्यापासून आंबोली बाजारपेठेपर्यंत आणि कावळेसाद येथे आहे. या सर्व भागात दाट धुके असते. त्यामुळे शंभर फुटांच्या पुढचे दिसत नाही. त्यामुळे धिंगाणा नेमका कोठे, कसा चाललाय हे शोधणेही कठीण बनते. शिवाय हे नशेबाज कावळेसाद, महादेवगड पॉईंट अशा दरीच्या तोंडावर असलेल्या ठिकाणी अतिउत्साह दाखवितात. दारूच्या नशेत दरीत पडून जायबंद झाल्याच्या किंवा मृत्यू पावल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. दरीत पडल्यानंतर मृतदेह बाहेर काढायला एक-दोन दिवस तरी लागतातच. अशा वेळी तो पर्यटक दारूच्या नशेत होता की कसा, हे शवविच्छेदनातून स्पष्ट करणे जवळपास अशक्‍य असते.

सामाजिक प्रश्‍न
अशा अतिउत्साही पर्यटकांमुळे आंबोलीचे स्वास्थही या काळात बिघडू लागते. अशा बेशिस्त पर्यटकांमुळे प्लास्टिक, दारूच्या बाटल्या यांचा कचरा गावभर पसरतो. आंबोलीतील साधारण १० टक्के लोक पर्यटन व्यवसायात आहेत. या अतिउत्साहामुळे त्यांच्या व्यवसाय वाढीला मर्यादा येतात. या बरोबरच इतर ९० टक्के लोकांना या नशेबाजांच्या उपद्रवाचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामाजिक प्रदूषण निर्माण होते. कुटुंबवत्सल पर्यटकांना होणारा त्रास हा आणखी एक वेगळा प्रश्‍न असतो.

धिंगाणा येथे नेहमीचा
 घाटात कारटेपच्या मदतीने मोठमोठ्याने गाणी लावून भर रस्त्यात अर्धनग्न अवस्थेत नाच घाटात गाड्या बेशिस्तपणे लावून इतर पर्यटकांसोबत दादागिरी
 पर्यटनस्थळाच्या ठिकाणी उघडपणे दारूचे सेवन  कावळेसाद, महादेवगड पॉईंट येथे रेलिंग ओलांडून स्टंटबाजी व सेल्फी  नशेबाजांकडून गटबाजी करत विकृत चाळे  मुख्य धबधब्यावर टोकदार खडकाच्या ठिकाणी जीवघेणी स्टंटबाजी

खासगी सुरक्षा यंत्रणा
सागरी किनाऱ्यावर जीवरक्षक नियुक्ती बंधनकारक करण्यात आली आहे. आंबोली येथे थेट खोल दऱ्या असल्याने धोकादायक आहे. नशेबाज आणि अति उत्साही पर्यटकांना आळा घालण्यासाठी येथे जीवरक्षकाच्या धर्तीवर यंत्रणा उभारणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पोलिसांबरोबरच स्वतंत्र यंत्रणा उभारता येऊ शकते. त्यासाठी खासगी सुरक्षा यंत्रणेचा वापरही करता येऊ शकतो.

दारूवर मर्यादा हवी
पर्यटनस्थळाच्या ठिकाणी संपूर्ण दारूबंदी असावी असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. कारण पर्यटन म्हणजे मौजमजा अशी व्याख्या करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे; मात्र किमान सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाला बंदीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि कर्नाटक आणि गोव्यातून अनधिकृतरीत्या आंबोलीत आणला जाणारा दारूचा साठा गावाच्या सीमेवरच अडवता आला तर बऱ्यापैकी नशेबाजांना रोखणे शक्‍य आहे. तसे केल्यास कुटुंबवत्सल पर्यटकांचा ओढा आंबोलीकडे पुन्हा वळू शकेल. शिवाय कोणाच्या तरी दुसऱ्याच्या चुकांमुळे होणारी आंबोलीची बदनामी थांबेल. यासाठी प्रशासनाने ॲक्‍शन प्लान बनविणे आवश्‍यक आहे.

कावळेसादची घटना हा अपघात नसून मुद्दामहून केलेला प्रकार आहे. घाटात तसेच कावळेसादमध्ये मृतदेह टाकल्याचे प्रकारही वाढले आहेत. अशा प्रकारामध्ये अनेकदा खरे गुन्हेगार मोकाट राहतात. आंबोलीमधील दऱ्यांमध्ये बेवारस मृतदेह मिळाल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. धिंगाणा घालणाऱ्या मस्तीखोर पर्यटकांची संख्या वाढते आहे. गुन्हेगारी कारवायांसाठीदेखील घाटाचा वापर होत आहे. त्यामुळे आंबोलीच्या सौंदर्याला गालबोट लागत आहे. बाहेरच्या लोकांमुळे होणारी ही बदनामी थांबायला हवी. नको त्या करामती असे नशेबाज करत असल्याने कुटुंबवत्सल पर्यटक कमी होत आहेत. याची प्रशासनाने दखल घ्यायला हवी.
- शशिकांत गावडे, माजी सरपंच, आंबोली

आंबोलीत पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांनी मौजमजा करावी; पण अतिउत्साह टाळावा. मद्यपी पर्यटकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पार्किंग व्यवस्था आणि अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिसांची कुमक वाढविण्यात आली आहे.
-दीक्षितकुमार गेडाम,  पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग

दारूच्या नशेत असलेली व्यक्ती आपली तार्किक क्षमता गमावते. यामुळे ती व्यक्ती नशेत काहीही करायला तयार होते. साहजिकच अशी अवस्था जीवावर बेतणारीसुद्धा ठरते. यातूनच कावळेसादसारख्या दुर्घटना घडतात.
- डॉ. कौस्तुभ लेले, मानसोपचारतज्ज्ञ

आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांनी इथल्या निसर्गाचा अनुभव घ्यावा. त्यांनी येथे गैरवर्तन करू नये. हे अतिउत्साही येथील निसर्गाशी लढाई करताना दिसतात. आपत्ती व्यवस्थापनाचा अशा वेळी पत्ता नसतो. पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्तेही ठीक नाहीत. त्यामुळे अपघात होतात. पर्यटकांनी स्वतःच्या आचरणावर नियंत्रण ठेवायला हवे. आंबोलीत हे अतिउत्साही प्रकार थांबविण्याची वेळ आली आहे. तसे न झाल्यास याचे दुष्परिणाम इथल्या लोकांना भोगण्याची वेळ येऊ शकते.
-दिलीप सावंत, पर्यटन व्यावसायिक

काही पर्यटक अगदी सकाळपासूनच दारू पिऊन आलेले असतात. त्यांच्याकडून हिडीस प्रकार सुरू असतात. पोलिसांनाही त्यांना रोखणे मुश्‍कील होते. अशा प्रकारांमुळे इथले पर्यटन पॉईंट बदनाम होत आहेत. असेच चालू राहिल्यास भविष्यात येथील पर्यटन मंदावण्याची भीती आहे. याची वेळीच दखल घेणे आवश्‍यक आहे.
-सुरेश चव्हाण,  पर्यटन व्यावसायिक

Web Title: konkan news Amboli tourism