वेंगुर्लेत सेना, भाजपकडून मोर्चेबांधणी

वेंगुर्लेत सेना, भाजपकडून मोर्चेबांधणी

वेंगुर्ले - अवघ्या दीड महिन्यांवर होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. भाजपने विविध उपक्रमांद्वारे तालुक्‍यात प्रत्येक ग्रामपंचायतीवर संपर्क साधून एकप्रकारे प्रचारास प्रारंभ केला आहे. नारायण राणेंच्या कथित भाजप प्रवेशामुळे काँग्रेस अजूनही थंडच आहे. शिवसेनेनेही गाववार मोहीम सुरू केली आहे. तालुक्‍यातील २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १४ ऑक्‍टोबरला होणार आहेत.

गेल्यावर्षी डिसेंबर २०१६ मध्ये पालिकांच्या निवडणुका झाल्या. फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर गेले सहा महिने निवडणुकीची रणधुमाळी थांबली होती. आता ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त पुन्हा एकदा रणधुमाळी सुरू होणार आहे.

तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय पक्षाचे पदाधिकारी गावागावात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेऊन निवडणुकीचा प्रचारही करीत आहेत. त्यात भाजपने आघाडी घेतली आहे. इच्छुक उमेदवारांसह सर्वच पक्षांची उमेदवारांच्या बाबतीत दमछाक होताना दिसत आहे. तालुक्‍यात होणाऱ्या २३ ग्रामपंचायतींवर आपापला झेंडा फडकावा, यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.

तालुक्‍यातील बहुतांशी ग्रामपंचायती या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. नारायण राणे यांच्या कथित भाजप प्रवेशाने येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत या ग्रामपंचायती भाजपकडे खेचण्यासाठी भाजपतर्फे मोठ्या हालचाली सुरू आहेत. त्याला शह देण्यासाठी शिवसेनेनेही प्रचार सुरू केला आहे. तशी यंत्रणा कामालाही लागली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी अद्याप थंडच आहेत. सरपंच पद थेट जनतेतून निवडून देण्यात येणार असल्याने गावातील आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते, विविध सोसायटीचे अध्यक्ष यांनी आपापल्या पक्षाकडे आपआपली मोर्चेबांधणी केलेली दिसत आहे. सरपंच पदासाठी आपणास हवे तसे आरक्षण न मिळाल्याने काहींनी सदस्य पदासाठी आपले प्रयत्न चालविले आहेत.

वेंगुर्ले तालुक्‍यातील सरपंचपदाचे आरक्षण
अनुसूचित जाती (महिला) परुळे बाजार, अनुसूचित केळूस, इतर मागास प्रवर्ग (महिला) वेतोरे, आडेली पेंडूर, आसोली, इतर मागास प्रवर्ग, चिपी, पालकरवाडी, तुळस, पाल, खुला वर्ग (महिला), कुशेवाडा, कोचरा, मेढा, खानोली, होडावडा, अणूसर, मातोंड, मोचेमाड, सागरतीर्थ, आरवली, खुलावर्ग - भोगवे, म्हापण, वायंगणी, दाभोली, मठ, वजराठ, परबवाडा, उभाडांदा, शिरोडा, रेडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com