काँग्रेस-सेनेकडून भांडणे लावण्याचे काम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

कणकवली - पारंपरिक, मिनी आणि मोठे पर्ससीन नेटधारक ही सर्व मंडळी मच्छीमार आहेत. एकमेकांची नातेवाईक आहेत. या मंडळींमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचे काम शिवसेना आणि काँग्रेसची नेतेमंडळी करीत आहेत. तर भाजप या सर्वांमध्ये समन्वयाची भूमिका पार पाडत आहे, असे भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी आज येथे स्पष्ट केले.

कणकवली - पारंपरिक, मिनी आणि मोठे पर्ससीन नेटधारक ही सर्व मंडळी मच्छीमार आहेत. एकमेकांची नातेवाईक आहेत. या मंडळींमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचे काम शिवसेना आणि काँग्रेसची नेतेमंडळी करीत आहेत. तर भाजप या सर्वांमध्ये समन्वयाची भूमिका पार पाडत आहे, असे भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी आज येथे स्पष्ट केले.

येथील भाजप कार्यालयात श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल उपस्थित होते. श्री.तेली म्हणाले, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी काल भाजप नेत्यांवर टीका केली होती. भाजप जिल्हाध्यक्ष श्री.जठार हे पैशासाठी पर्ससीनची बाजू घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र नाईक यांची टीका हास्यास्पद आहे. पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळायलाच हवा. त्यांच्या हिताचे आणि हक्‍काचे संवर्धन व्हायलाच हवे अशीच भाजपची भूमिका आहे. त्यात कुठेच बदल झालेला नाही.

ते म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक आणि पर्ससीन नेटधारक मच्छीमारांत वाद आहे. हा वाद मिटविण्याचे काम भाजपच्याच सरकारने केले. तत्कालीन मत्स्यमंत्री एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्र्यांनी यात मोठी भूमिका बजावली होती. दरम्यान काही पारंपरिक मच्छीमार मिनी पर्ससीन नेटकडे वळले. त्यामुळे त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला. या घटकालाही न्याय मिळावा, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. पारंपरिक, मिनी आणि मोठे पर्ससीनधारक यांच्यात सामंजस्याने तोडगा निघावा, सर्वजण गुण्यागोविंदाने राहावेत यासाठीच आमची धडपड आहे.’’

सोमवंशी अहवालात बदल होऊ शकतो
राज्य शासनाने सोमवंशी अहवालाचा आधार घेऊन पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांसाठी हद्द निश्‍चिती केली होती. मात्र आता मिनी पर्ससीनचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमवंशी अहवालात देखील बदल होऊ शकतो. केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात ज्या प्रमाणे सर्व घटकांना सामावून घेऊन मच्छीमारी सुरू आहे. त्याचधर्तीवर महाराष्ट्रातही मच्छीमारीसाठीच्या क्षेत्रात बदल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे श्री.तेली म्हणाले.

पालकमंत्र्यांनी खंडणीची चौकशी करावी
पर्ससीन नेटधारकांकडून भाजपची मंडळी खंडणी घेत असल्याचा आरोप आमदार नाईक यांनी केला आहे. यात तथ्य असेल तर त्यांनी जरूर चौकशी व्हावी. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आहेत. त्यांच्याकडे गृहराज्य मंत्रीपद देखील आहे. तसेच जिल्ह्यातील दोन्ही आमदार आणि खासदार देखील शिवसेनेचे आहेत. त्यामुळे खंडणीचे आरोप करण्यापेक्षा, गृहराज्यमंत्र्यांमार्फत आधी चौकशी करावी असेही श्री.तेली म्हणाले.

शिवसेनेची भूमिका वेगवेगळी
पारंपरिक मच्छीमारांचा पुळका असलेल्या शिवसेनेची भूमिका प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्‍यात वेगवेगळी आहे. सिंधुदुर्गात पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने तर रत्नागिरी पर्ससीन मच्छीमारांच्या बाजूने शिवसेना आंदोलन करत आहे. सिंधुदुर्गात होणारी पर्ससीन ट्रॉलर्सची घुसखोरी ही शिवसेनेच्या आशीर्वादामुळेच होत असल्याचाही आरोप श्री.तेली यांनी केला.

पाणी मीटर घोटाळ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
नगरपंचायतीच्या पाणी मिटरमध्ये घोटाळा झाला आहे. तसा आरोप देखील नगरसेवकांनी नगरपंचायत सभेत केला आहे. या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी व्हावी आणि जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे श्री.तेली म्हणाले.

लवकरच शासनस्तरावर समिती
मच्छीमारांतील वाद कायमस्वरूपी निकाली लावण्यासाठी पारंपरिक मच्छीमार, मिनी, मोठे पर्ससीन नेट धारक तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती गठित होणार आहे. ही समिती राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीची पाहणी करेल. सर्व मच्छीमार घटकांशी चर्चा करेल आणि त्याचा अहवाल शासनाला देईल असे श्री.तेली म्हणाले.

Web Title: konkan news congress shiv sena rajan teli