प्रेमाचे नाटक रचून दोन मुलींची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

सावंतवाडी / मालवण - मूळ मालवणमधील व मुंबईस्थित प्रियकराने तब्बल दोन अल्पवयीन मुलींना आपल्या प्रेमपाशात अडकविल्याचा प्रकार आज उघड झाला. नातेवाइकांच्या तक्रारीनंतर एका मुलीसह त्या युवकाला मालवण पोलिसांनी सावंतवाडीत ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या मुलीच्या घरी दुसऱ्या मुलीने धाव घेऊन तो आपलासुद्धा प्रियकर आहे, असा दावा केल्यामुळे पोलिससुद्धा चक्रावले. त्यानंतर झालेल्या चौकशीत हा प्रकार उघड झाला. 

सावंतवाडी / मालवण - मूळ मालवणमधील व मुंबईस्थित प्रियकराने तब्बल दोन अल्पवयीन मुलींना आपल्या प्रेमपाशात अडकविल्याचा प्रकार आज उघड झाला. नातेवाइकांच्या तक्रारीनंतर एका मुलीसह त्या युवकाला मालवण पोलिसांनी सावंतवाडीत ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या मुलीच्या घरी दुसऱ्या मुलीने धाव घेऊन तो आपलासुद्धा प्रियकर आहे, असा दावा केल्यामुळे पोलिससुद्धा चक्रावले. त्यानंतर झालेल्या चौकशीत हा प्रकार उघड झाला. 

फुस लावून पळवून नेणाऱ्या संदीप सखाराम कदम (वय 25, रा. हेदुळ-खोटले, ता. मालवण) याच्यावर रात्री उशिरा अपहरण केल्याप्रकरणी अटकेची कारवाई सुरू होती, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः संबंधित अल्पवयीन मुलगी 30 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी मालवण पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा मोबाईल लोकेशनद्वारे शोध घेतला असता संबंधित युवती सावंतवाडीत असल्याचे उघड झाले. त्यानुसार उपनिरीक्षक गायत्री पाटील यांच्यासह विजय धुरी, रुपेश सारंग, संतोष नाटेकर यांच्या पथकाने सायंकाळी सावंतवाडी येथून त्या अल्पपवयीन मुलीसह संशयित कदम याला ताब्यात घेतले. रात्री उशिरा मालवण पोलिस ठाण्यात त्यांना आणण्यात आले. त्यानंतर कदमच्या अटकेची कारवाई सुरू होती. चोवीस तासात या प्रकरणाचा उलगडा करण्यास मालवण पोलिसांना यश आले, असे पोलिस निरीक्षक बोडके यांनी स्पष्ट केले. याबाबतचा अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. 

त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा शोध घेत दुसरी मुलगी त्या मुलीच्या घरी आली. आपण संदीपवर प्रेम करतो, तो आणि तुमची मुलगी कोठे आहे, अशी विचारणा तिने पहिल्या मुलीच्या वडिलांना केली; मात्र झालेल्या प्रकारानंतर अधीच अडचणीत असलेल्या पहिल्या मुलीच्या वडिलांनी तिला घेऊन पोलिस ठाण्यात धाव घेतली. सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्या मुलीची चौकशी करण्यात आली. या वेळी आपण त्या युवकाशी प्रेम करते. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे आपण त्याला शोधण्यासाठी आलो, असे तिने सांगितले. संबंधित अल्पवयीन मुलगीची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली. ती मुंबईतील येथील असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तिच्या घरी पोलिसांनी फोन केल्यानंतर आपण तिला स्वीकारणार नाही, अशी भूमिका तिच्या आई-वडिलांनी घेतली. त्यामुळे तिला महिला निवारा केंद्रात दाखल करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. 

पालकांकडून जबाबदारी घेण्यास नकार 
याबाबत दुसरी बाजू घेण्यासाठी सावंतवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""संबंधित मुलगी मुंबईतील आहे. त्या युवकाचा शोध घेत आपण या ठिकाणी आलो, असे तिचे म्हणणे आहे. त्यानुसार चौकशी सुरू आहे. त्या युवकाला व अन्य एका मुलीला आधीच मालवण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या युवकावर प्रेम आहे, असे या मुलीचे म्हणणे असले तरी ती अल्पवयीन असल्यामुळे तिच्या दाव्याला अर्थ नाही. त्यामुळे तिला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. प्राथमिक स्थितीत पालकांचा ताब्यात घेण्यास नकार आहे; परंतु याबाबत प्राथमिक तपास करू आणि त्यानंतर काय करावे, याचा निर्णय घेतला जाईल.'' 

"त्या' प्रकरणाशी काही संबंध नाही 
मालवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बोडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""सावंतवाडीत मिळालेल्या मुलीचा या प्रकरणाची तूर्तास तरी काही संबंध आहे, असे वाटत नाही. या ठिकाणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार संबंधित युवकाला अटक केली आहे. त्या ठिकाणचा तपास तेथील पोलिस करतील.'' 

Web Title: konkan news crime