डिंगणी-जयगड रेल्वे मार्गात नवे विघ्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

देवरूख - डिंगणी रेल्वे स्थानकावरून सुरू असलेला वाद, खाडी भागातील अनेक गावांनी रेल्वे मार्गाला सुरू केलेला विरोध, काही ग्रामपंचायतींनी केलेला विरोधी ठराव आदी कारणांमुळे सुरुवात होण्याआधीच समस्येंच्या गर्तेत अडकलेल्या प्रस्तावित डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाच्या पूर्ततेसमोरील संकट आता सुरेश प्रभूंच्या राजीनाम्याने आणखीनच गडद झाले आहे. 

देवरूख - डिंगणी रेल्वे स्थानकावरून सुरू असलेला वाद, खाडी भागातील अनेक गावांनी रेल्वे मार्गाला सुरू केलेला विरोध, काही ग्रामपंचायतींनी केलेला विरोधी ठराव आदी कारणांमुळे सुरुवात होण्याआधीच समस्येंच्या गर्तेत अडकलेल्या प्रस्तावित डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाच्या पूर्ततेसमोरील संकट आता सुरेश प्रभूंच्या राजीनाम्याने आणखीनच गडद झाले आहे. 

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी दिलेला केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा स्वीकारून त्यांच्याकडून रेल्वेमंत्रीपद काढून घेण्यात आले. कोकण रेल्वे, जिंदल आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या संयुक्‍त करारानुसार संगमेश्‍वर तालुक्‍यातील डिंगणी ते जयगडमधील जिंदलचे अत्याधुनिक बंदर अशा ३५ कि.मी. अंतरात माल वाहतुकीसाठी नवा रेल्वे मार्ग बांधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून सर्वेक्षणानंतर या मार्गातील अडथळे आणखी ठळक होऊ  लागले आहेत.

कोकण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३५ किमीच्या या मार्गावर एकूण १७८८० मीटर लांबीचे ९ बोगदे उभारण्यात येणार आहेत. यातील सर्वाधिक मोठा बोगदा ४६५० मीटरचा असून तो संगमेश्‍वर तालुक्‍यातील उपळे - डावखोल मध्ये होणार आहे. मार्गात १४८५ मीटर पाण्याचा अडथळा असून ९ छोटे मोठे पूल येथे होणार आहेत. या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत ७७५ कोटी एवढी आहे. जयगड बंदरातून होणारी मालवाहतूक पाहता हा दुहेरी मार्ग ठेवण्यात येणार असून त्यात ४ पेक्षा अधिक स्थानके बांधण्यात येणार आहेत. 

सर्वेक्षणानंतर तातडीने संगमेश्‍वरातील डिंगणी गावात बांधण्यात येणाऱ्या स्थानकावरून या मार्गाला विरोध सुरू झाला. यानंतर उपळे - डावखोलमध्ये होणाऱ्या बोगद्याच्या एक्‍झॉस्ट मार्गाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे, त्यानंतर डिंगणीतील वाहतुकीचा नियमित रस्ताच या मार्गात गायब होणार असल्याने खाडी भागातील बहुतांश गावांनी या रेल्वे मार्गाला विरोध सुरू केला आहे. खाडी भागातील अनेक ग्रामपंचायतींनी या मार्गाला विरोध दर्शवण्यासाठी ग्रामसभेत विरोधी ठराव केले आहेत. या मार्गाच्या पूर्ततेचे मोठे आव्हान कोकण रेल्वेसमोर उभे राहणार आहे.

Web Title: konkan news Dingni-Jaigad railway route railway