कुणबी स्नेहसंमेलनाची  तयारी  जोरात 

दिलीप पाटील
सोमवार, 22 जानेवारी 2018

34  शेती  उत्पादने  आधुनिक  पद्धतीने  मल्चींग व  ठिंबक सिंचनाची  शेती  केली  असून  यामध्ये  कोबी,  कांदा,  टोमॅटो,  सिमला मिरची,  आले,  वांगी,  भेंडी,  मिरची,  कोथिंबीर,  बटाटे आदींची  लागवड  केली  असून  त्याचे  प्रात्याक्षिक  शेतकऱ्यांना पहावयास मिळणार आहे.  कमी  खर्च  व  मनुष्यबळात ही  शेती  केली  आहे.

वाडा - वाडा  तालुका  कुणबी  समाज  बांधवांच्या वतीने  येत्या  26 ते  28 जानेवारी  2018  या  कालावधीत  भव्य  दिव्य  कुणबी  स्नेहसंमेलन होत  असून  यावषीॅ ' कृषी  महोत्सव ' ही  स्नेहसंमेलनाची  थीम आहे.  कृषी  महोत्सव  या  संमेलनाचे  विशेष  आकर्षण  ठरणार आहे.  यासाठी  कुणबी  बांधव  तयारीच्या  कामाला  जोमात  लागले आहेत.  

यंदाचे  कुणबी  स्नेहसंमेलनाचे  हे  चौथे वर्ष  असून  दरवर्षी  वेगवेगळी  थीम          (संकल्पना) करून  महोत्सव  केला जात आहे.  मागील  वेळी  गावाची  संकल्पना महोत्सवात  साकारली  होती.  संमेलनात  गाव  वसवण्यात  आले  होते.  प्राचीन  व ग्रामीण  संस्कृतीची  ओळख  करून दिली होती.  नव्या  पिढीला  कृषी  संस्कृती  व ग्रामीण  लोकजीवनाचे  दर्शन  घडविले  होते.  बदलत  चाललेल्या  समाज  जीवनात कृषी  संस्कृती  हरवत  चालली आहे.  ही  संस्कृती  टिकावी  व  त्या माध्यमातून समाज  उभारणी  व्हावी  हा  संदेश  दिला  होता.  

यावर्षी  स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून  भव्य  कृषी  महोत्सव  आयोजित केला आहे.  या  कृषी  महोत्सवात  आधुनिक  शेती  ते  कृषी  उद्योजक  शेतकरी  ही  संकल्पना  साकारली आहे.  जवळपास  34  विविध  शेती  उत्पादने,  भाजीपाला याची  प्रत्यक्ष  लागवड  केली  असून  तिला  आधुनिकीकतेची  जोड दिली आहे.  आधुनिकीकतेची  जोड  दिल्याने  ही  उत्पादने  कमी  खर्चात  अधिक  कशी  घेतली  जातात हे  दाखवण्यात आले आहे.  या   कृषी  महोत्सवात  उत्पादन  होणारे  पिक  सर्व  सामान्य  शेतकरीही  आपल्या  शेतात  घेऊ  शकतो. आधुनिक  शेतीचे  प्रात्याक्षिक  शेतकऱ्यांना येथे  प्रत्यक्षात  पाहावयास  मिळणार आहे.  हेच  या  संमेलनाचे  विशेष  आकर्षण आहे.  शिवाय  शेतकऱ्यांनी पिकवलेला  भाजीपाला  व  इतर  शेती  उत्पादने  हमीभावाने  विकत  घेण्याचे  काही  उद्योजकांनी  आश्वासन  दिले  असून  त्याबाबतचे  करारही  स्नेहसंमेलनात  करण्यात  येणार  आहेत  अशी  माहिती  स्नेहसंमेलनाचे  अध्यक्ष  प्रफुल्ल  पाटील  यांनी  पत्रकार परिषदेत दिली.  

34  शेती  उत्पादने  आधुनिक  पद्धतीने  मल्चींग व  ठिंबक सिंचनाची  शेती  केली  असून  यामध्ये  कोबी,  कांदा,  टोमॅटो,  सिमला मिरची,  आले,  वांगी,  भेंडी,  मिरची,  कोथिंबीर,  बटाटे आदींची  लागवड  केली  असून  त्याचे  प्रात्याक्षिक  शेतकऱ्यांना पहावयास मिळणार आहे.  कमी  खर्च  व  मनुष्यबळात ही  शेती  केली  आहे.  याचबरोबर  शेतीला  पूरक  असे  कुकुटपालन ,  शेततळे  काढून  मत्सशेती ,  रेशीम  उद्योग  याची माहिती  येथे  देण्यात  येणार आहे.  एवढेच  नाही  तर  जे  शेतकरी  इच्छुक  असतील  अशांना  तालुक्यातच  शिवार  भेटही  संमेलनानंतर  देण्यात  येणार आहे  असेही  पत्रकार परिषदेत  प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले.  

याचबरोबर  कुणबी  समाजाच्या  अस्मितेचे  व  ऐतिहासिक  परंपरेचे    दर्शन घडविणाऱ्या  वस्तुंचे प्रदर्शन  तसेच  विविध  प्रकारची  पारंपरिक  नृत्ये  व  गायन प्रकार , प्रबोधनात्मक चर्चा  सत्रे,  परिसंवाद,  महिला  सक्षमीकरण  ,  शैक्षणिक प्रदर्शन  अशा  वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची  रेलचेल  या  स्नेहसंमेलनात दिसणार आहे. अशी माहिती  संमेलनाचे  उपाध्यक्ष  जयेश  शेलार यांनी पत्रकार परिषदेत  दिली.  

तीन  दिवस  होणाऱ्या  या  स्नेहसंमेलनात किर्तन ,  भजन,  विद्यार्थासाठी  मार्गदर्शन, स्पर्धा  परीक्षा  मार्गदर्शन,  मुले,  मुली  महिला  याच्यासाठी  सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी  हळदी  कुंकू  होणार आहे. वाडा  तालुक्यातील  गांध्रे येथील  माजी आमदार  लडकू नाना  भोईर  मैदानातील   सुमारे  42  एकर  जागेत  भव्य  दिव्य असा मंडप  टाकण्यात  येत  असून  कुणबी  समाज  हे  स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटत आहे.  

यावेळी  झालेल्या  पत्रकार परिषदेला स्नेहसंमेलन कोअर  कमिटीचे कोषाध्यक्ष रतिश पाटील,  दिपक  ठाकरे,  अनंता  पाटील  आदी  पदाधिकारी उपस्थित होते.  

Web Title: konkan news farmers