डॉल्बीला रामराम करून गणेश मंडळे ढोलपथकांकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

चिपळूण - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने चिपळुणातील ८ ढोल-ताशा पथकांचा सराव जोरात सुरू झाला आहे. शहरातील नागरिकांच्या कानावर ढोल-ताशांचे आवाज पडू लागले आहेत. अनेक उत्साही तरुण-तरुणी ढोल, ताशांचा सराव करीत आहेत. 

चिपळूण - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने चिपळुणातील ८ ढोल-ताशा पथकांचा सराव जोरात सुरू झाला आहे. शहरातील नागरिकांच्या कानावर ढोल-ताशांचे आवाज पडू लागले आहेत. अनेक उत्साही तरुण-तरुणी ढोल, ताशांचा सराव करीत आहेत. 

गणेशोत्सव, दुर्गोत्सवात यापूर्वी मोठ्या आवाजात डॉल्बी लावली जात होती. डॉल्बीचे दुष्परिणाम जाणवत असल्यामुळे शासनाने डॉल्बीवर बंदी आणली. त्यानंतर गणेशोत्सव मंडळे डॉल्बीला रामराम करून पारंपरिक ढोल-ताशांकडे वळू लागली आहेत. ढोलपथकात सहभागी झालेल्या मुला-मुलींना पाहिल्यानंतर प्रत्येकाला अभिमान वाटतो. लहान मुलाला ढोल वाजवताना पाहून कौतुक वाटते. पण या ढोलपथकाचे काम वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी खूप खडतर सराव करावा लागतो. मिरवणूक चार-पाच तास चालणार असेल, तर तेवढा वेळ ढोल वाजविण्याची क्षमता ठेवावी लागते. चिपळूण शहरातील मिरवणुकांमध्ये जास्तीत जास्त चाळीस ढोल वाजविण्यास पोलिसांकडून परवानगी दिली जाते. पण ढोल-ताशा आणि ध्वजपथकात ढोलसाठी चाळीस तरुण, ताशांसाठी पंधरा, ध्वज नाचविण्यासाठी अकरा, टोल वाजविण्यासाठी पाच असे ७५ बाहेरील माणसं आत येऊ नयेत म्हणून दोर धरण्यासाठी तेरा तसेच मिरवणूक व्यवस्थापन, प्रशिक्षणासाठी मिळून शंभरहून अधिक लोक काम करत असतात. व्यवस्थापनामध्ये गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सक्रिय असतात. विघ्नहर्ता, जय हनुमान, कालभैरव, स्वरभ्रंम, शिवध्वनी, शिवगर्जना, रामवरदायिनीसह आवाशी येथील कुलस्वामिनी ढोल-ताशा पथकांची सध्या तयारी सुरू आहे. ढोल-ताशा वाजवणे सध्या कौतुकास्पद वाटते. त्यामुळे नऊ वर्षांच्या मुलांपासून पन्नास वर्षांची व्यक्तीही तितक्‍याच उत्साहाने सहभागी होतात. 

जून महिन्यात ढोल बांधण्यापासून ते वाजविण्यापर्यंत प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर दररोज एक तास सराव घेतला जातो. ढोल वजनाला जड असला तरी वाजविण्यास सोपा, तर ताशा हलका असला तरी वाजवायला अवघड असतो. त्यामुळे ज्यात आवड असेल ते वाद्य वाजविण्यास दिले जाते.
-दीपक शितप, जय हनुमान ढोल-ताशा पथक

Web Title: konkan news Ganesh Mandals Dolby