सरकारी कार्यालयांचे छत ताडपत्र्यांचे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नेरळ - कर्जत तालुक्‍यात पावसाळ्यापूर्वी सरकारी कार्यालयाच्या छपरांवर प्लास्टिकचे आच्छादन टाकून तात्पुरती मलमपट्टी करत असल्याचे चित्र आहे.

नेरळ - कर्जत तालुक्‍यात पावसाळ्यापूर्वी सरकारी कार्यालयाच्या छपरांवर प्लास्टिकचे आच्छादन टाकून तात्पुरती मलमपट्टी करत असल्याचे चित्र आहे.

तालुक्‍यात बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, पोलिस निरीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांत अधिकारी कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, आयटीआय, महावितरण, कृषी अधिकारी कार्यालय, वन विभाग, सामाजिक वनीकरण कार्यालय, सरकारी आश्रमशाळा आदींची कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांची देखभाल आणि दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. कर्जत तालुक्‍यात प्रांत अधिकारी कार्यालयाची उभारणी करण्यात आली. त्याशिवाय तालुक्‍यात कुठेही बांधकाम विभागाकडून सरकारी कार्यालय नव्याने बांधण्यात आले नसल्याची माहिती आहे.

दर वर्षी पावसाळ्यात अनेक सरकारी कार्यालयांत पावसाचे पाणी गळते. ते थांबविण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केली जात आहे. गळक्‍या सरकारी कार्यालयांच्या छपरावर प्लास्टिकचे आच्छादन टाकले जात आहे. तहसील कार्यालय आणि पोलिस उपअधीक्षक यांची कार्यालये सर्वाधिक गळकी असून, त्यांच्या छपरावर प्लास्टिक टाकण्यात आले आहे. 

आमच्याकडे शासकीय कार्यालयांच्या देखभाल-दुरुस्ती आणि नव्याने कार्यालये उभारणी करण्याची जबाबदारी असते. निधी मिळाल्यास त्याप्रमाणे कामे करून घेतली जातात. सध्या पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वीची कामे केली जात आहेत.
- सी. एम. सनहाल, उपअभियंता, कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: konkan news government office