दोन खात्यांच्या वादात ३५ वर्षांत दमडीही खर्च नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

खेड - शहरातील भोस्ते पुलावर गेल्या ३५ वर्षात एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे आज हा पूल अखेरच्या घटका मोजत आहे. 

खेड - शहरातील भोस्ते पुलावर गेल्या ३५ वर्षात एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे आज हा पूल अखेरच्या घटका मोजत आहे. 

येत्या आठ-दहा दिवसांत पुलाच्या किमान डागडुजीच्या कामास सुरुवात झाली नाही, तर येथील जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडून जिल्हा परिषद बांधकाम कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा युवा कार्यकर्ते श्री. गौस खतीब यांनी दिला आहे. शहरातील मुकादम हायस्कूल ते भोस्ते गाव जोडणारा  हा पूल आहे. याच पुलावरून रेल्वेस्टेशन व चिपळूणकडे जाण्या-येण्यासाठी गाड्यांची वर्दळ चालू असते. खाडीपट्टयातील भोस्ते, निळिक, अलसुरे, कोंडिवली, शीव आदी गावात जाणारी वाहतूक याच पुलावरून होते. तसेच चिपळूणला जाणारा पर्यायी मार्ग म्हणूनही या पुलाचा उपयोग होतो. मात्र सध्या या पुलाची अवस्था बिकट झाली आहे. तो पूर्णपणे एका बाजूला खचला आहे. सगळे जॉईंट्‌स सुटले आहेत. पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा पूल नेमका कोणत्या खात्याच्या अखत्यारीत येतो, याबाबत जिल्हा परिषद बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभाग हे एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे या वादात गेल्या ३५ वर्षात या पूलासाठी एक रुपयासुद्धा खर्च करण्यात आलेला नाही. ही माहिती कळल्यावर गौस खतीब यांनी रिझवान सिद्धिकी, जुबेर कावलेकर, मसूद ढेणकर, यासीन परकार, आदम जसनाईक आणि भोस्ते व परिसरातील कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषद बांधकाम कार्यालयावर धडक दिली. प्रभारी उपअभियंता श्री. खेडेकर व शाखा अभियंता यांना घेऊन भोस्ते पुलावर आले. पुलाची अवस्था दाखवली. हा पूल धोकादायक असल्याला खेडेकर यांनी पुष्टी दिली. येत्या आठ-दहा दिवसांत  डागडुजी व नंतर पुलाच्या बांधकामास सुरवात करावी. बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी केली. तत्काळ आम्ही तसे पत्र येथील पोलिसांना देतो, असे खेडेकर यांनी सांगितले.

Web Title: konkan news khed bridge