हेदलीच्या माजी सरपंचासह दहाजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

खेड - तालुक्‍यातील हेदली गावातील काणेकर मोहल्ला व म्हादेवाडीसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळ-पाणी योजनेतील जमिनीच्या बक्षीसपत्रप्रकरणी दहाजणांविरोधात फसवणुकीसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे खेड पोलिस ठाण्यात दाखल केले आहेत. या प्रकरणी अहमद बांगी यांनी तक्रार केली होती. खेड पोलिसांकडे हे प्रकरण २० जूनला तपासासाठी पाठवले. त्यानुसार २८ जूनला नोंद करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गावच्या माजी सरपंचासह ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व पाणीपुरवठा समितीच्या सदस्यांचा देखील समावेश आहे.

हेदली काणेकर मोहल्ला येथील रहिवासी अहमद दाऊद बांगी याचा व गावातीलच रहिवासी सरवर मोहिद्दीन कुडुपकर, आरिफ अब्दुल रहिमान काणेकर व हमजामियॉ इब्राहिम चिपळूणकर यांचा वाद झाला होता. त्यावेळी कुडुपकर, काणेकर व चिपळूणकर यांनी बांगी याला आम्ही गावच्या पेयजल योजनेच्या बक्षीसपत्रावर देखील तुझ्या सह्या बोगस केल्या आहेत, तू आमचे काय वाकडे केलेस असे म्हटले होते. त्यानंतर बांगी यांनी खेड दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी केलेल्या बक्षीस पत्राची नक्कल मिळवली. बक्षीस पत्र २१७९-२०१३ अशा क्रमांकाचे आहे. ते राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाण्याचे साठवण टाकी बांधण्यासाठी दिलेल्या जागेचे आहे. बक्षीसपत्र झाल्यावर शासनामार्फत पेयजल योजनेकरीता निधी आला होता. त्या बक्षीसपत्राला चार मुखत्यारपत्र जोडलेली आहेत. त्यामध्ये सरवर मोहिद्दीन कुडुपकर, आरीफ अब्दुल रहिमान काणेकर, हमजामियॉ इब्राहिम चिपळूणकर, स्मिता शांताराम चिनकटे, बशीर महमद खडपोलकर, आरीफ अब्दुल रहिमान काणेकर, नजमा मुर्तुजा काणेकर, हमजामियॉ इब्राहिम चिपळूणकर, मोहिद्दीन अब्बास कुडुपकर, शेखरअल्ली अल्ली काणेकर, अ. रहिमान अल्ली काणेकर व अ. लतीफ गफुर काणेकर (सर्व रा. हेदली, ता. खेड) यांनी १९ जुलै २०१३ ते २८ आगस्ट २०१३ या कालावधीत संगनमताने मुखत्यारपत्रात बोगस व्यक्ती म्हणून सह्या करून शासनाची तसेच अहमद बांगी यांची खोटी सही करून त्यांची फसवणूक केली. शासनाचा निधी प्राप्त करून घेऊन शासनाची फसवणूक केली, अशी तक्रार अहमद बांगी यांनी खेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात केली. न्यायालयाने या प्रकरणी भारतीय दंड विधानाचे कलम ४२०, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७०, ४७१ अन्वये दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून खेड पोलिस ठाण्यात तपासासाठी पाठवला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एन. व्ही. जाधव करीत आहेत.

Web Title: konkan news khed crime

टॅग्स