हंगाम फायद्यात; दरात चढ-उतार, तरीही उत्पन्न वाढले

संतोष कुळकर्णी
सोमवार, 5 जून 2017

हंगाम फायद्यात; दरात चढ-उतार, तरीही उत्पन्न वाढले

खवय्यांच्या विशेष पसंतीस उतरलेल्या ‘देवगड हापूस’ आंब्यासह जिल्हाभरातील बागायतदार शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने अपेक्षित साथ दिली. वळवाच्या पावसाने दिलासा दिल्याने बागायतदारांच्या सर्व आंबा हाती येऊ शकला. फळबाजारात अखेरच्या टप्प्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे दरात काहीसा चढउतार राहिला. स्थानिक बाजारातही मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीस उपलब्ध होता. निसर्गाने हापूसला व पर्यायाने बागायतदाराला तारले. तुलनेत यंदा आंबा उत्पादन वाढले. यंदाच्या हापूस हंगामाचा घेतलेला हा आढावा... 

हंगाम फायद्यात; दरात चढ-उतार, तरीही उत्पन्न वाढले

खवय्यांच्या विशेष पसंतीस उतरलेल्या ‘देवगड हापूस’ आंब्यासह जिल्हाभरातील बागायतदार शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने अपेक्षित साथ दिली. वळवाच्या पावसाने दिलासा दिल्याने बागायतदारांच्या सर्व आंबा हाती येऊ शकला. फळबाजारात अखेरच्या टप्प्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे दरात काहीसा चढउतार राहिला. स्थानिक बाजारातही मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीस उपलब्ध होता. निसर्गाने हापूसला व पर्यायाने बागायतदाराला तारले. तुलनेत यंदा आंबा उत्पादन वाढले. यंदाच्या हापूस हंगामाचा घेतलेला हा आढावा... 

हंगामाला प्रारंभ
अलीकडे साधारणतः जानेवारीपासूनच हापूस फळबाजारात जाण्यास सुरवात होते. काही प्रगतिशील आंबा बागायतदार पावसाळ्यात आलेला मोहोर टिकवून त्यातून उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा काही बागायतदारांचा आंबा वेळेआधी फळबाजारात पोचतो. सुरवातीला सलामीच्या आंबा पेटीला दामदुप्पट दर मिळत असल्याने त्याचा लाभ उठवण्यासाठी बागायतदारांची चढाओढ असते. पूर्वी गुढी पाडव्याला मुहूर्ताची पेटी फळबाजारात पाठवली जाई. त्यानंतर खऱ्या अर्थाने आंबा हंगामाला प्रारंभ होऊन मे महिन्यात हंगाम जोरात चाले, मात्र अलीकडे निसर्गाच्या भयाने आंबा हंगाम लवकर सुरू होऊन लवकर उरकला जातो. मेमध्ये वळवाच्या पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन वेळीच हंगाम आटोपण्याकडे बागायतदारांचा कल असतो. 

यंदाचा हंगाम
गेल्यावर्षी पाऊस समाधानकारक झाला. थंडीचे प्रमाणही चांगले राहिल्याने आंबा कलमांना अपेक्षित मोहोर आला. यंदाच्या आंबा हंगामातील हापूसचा पहिला बहर चांगला आला आणि पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात गेला. दुसऱ्या टप्प्यातील आंबा एप्रिलमध्ये तर मेमध्ये अखेरच्या टप्प्यातील आंबा बाजारात गेला. अखेरच्या टप्प्यातील आंबा उत्पादन तुलनेत अधिक झाले. यामुळे फळबाजारातील आवक एकदम वाढली. वातावरण चांगले राहिल्याने सर्व आंबा बागायतदाराच्या हाती येण्यास मदत झाली. वळवाचा पाऊस, वादळी वारा यापासून बागायतदारांना दिलासा मिळाल्याने सर्व आंबा बागायतदारांच्या सुखरूप हाती आला. यामुळे बागायतदार एकीकडे खूश होता, तर दुसरीकडे उत्पादन वाढल्याने दराच्या झालेल्या घसरणीमुळे हिरमुसला.

उत्पादन वाढ 
दरवर्षी शेकडो कलम झाडांची लागवड होत असल्याने एकूणच आंबा उत्पादन वाढत असल्याचे चित्र आहे. सरासरी आंबा पीक कमी अधिक प्रमाणात येत असल्याची ओरड असली तरी एकूणच आंबा बागांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने बाजारातील आंबा उलाढालीवर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. आंबा उत्पादनाची टक्‍केवारी काहीशी घसरत असली तरी बागांची संख्या वाढल्याने उत्पादन तेवढेच येत असल्याचे दिसते.

विक्री व्यवस्थेत बदल
एकेकाळी केवळ वाशी फळबाजारावरच अवलंबून असणारा आंबा आता राज्याच्या विविध भागांसह परराज्यातही पाठवला जात आहे. स्थानिक पातळीवरही आंबा मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागला आहे. फळबाजारात पाठवल्या जाणाऱ्या आंब्यामधील दराची होणारी संभाव्य घसरण आणि त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी आंबा बागायतदारांनी अन्य पर्याय अवलंबण्यास सुरवात केली आहे. मुंबईसह पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नाशिकसह गोवा, बेळगाव आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये हापूस जाऊ लागला आहे. यासाठी बागायतदारांनी स्वतःची विक्री व्यवस्था उभारली आहे. त्या माध्यमातून आपला आंबा थेटपणे ग्राहकांना विकला जात आहे. यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याच्या बागायतदारांच्या प्रतििक्रया आहेत.

बाजारपेठांचा अनुभव
अलीकडे काही प्रगतिशील आणि तरुण बागायतदारांनी पारंपरिक विक्री व्यवस्थेत बदल घडवून आपली उन्नती साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बाजारपेठांचा अभ्यास केला. देवगडसह जिल्ह्यातील वातावरण आंब्यासाठी पोषक असते. यामुळे येथे उघड्या हवेवरही आंब्याला रंग चढतो. नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकण्यास मदत होते, मात्र हाच हिरवा आंबा घटमाथ्यावर पाठवल्यास त्याच्या पिकण्यामध्ये अडचणी जाणवतात. यामुळे ग्राहकांची ओरड होऊन त्याचा फटका बागायतदारांना सहन करावा लागतो. याचा अभ्यास बागायतदारांनी करून स्थानिक पातळीवरच आंबा पिकवून थेट बाजारपेठेत विक्रीस नेला जात असल्याने त्याला ग्राहकांकडून प्रतिसाद चांगला मिळतो. स्थानिक पातळीवर आंबा पिकवल्याने पेट्यांमध्ये आंबा भरताना खराब आंबा आपोआपच बाजूला केला जातो. तसेच आंबा पिकेल की नाही, याची शाशंकता ग्राहकांच्या मनात राहत नाही.

वाहतूक यंत्रणा
तरुण आंबा बागायतदारांनी प्रमुख बाजारपेठेमध्ये स्वतः आंबा नेऊन विकण्यावर भर दिला आहे. यासाठी बागायतदारांनी स्वतःची वाहतूक यंत्रणा उभारली आहे. बागांमधून हापूसची वाहतूक करण्यासाठी टेम्पो घेतलेले आहेत. त्याचा उपयोग हापूस विक्रीसाठी केला जात आहे. स्थानिक पातळीवर आंबा पिकवून पेट्या भरून रात्रभर प्रवास करून इच्छित शहर गाठले जाते. यामुळे हापूसला उन्हाचा तडाखा जाणवत नाही. शहरात टेम्पो उभा करून हापूस विकला जात असल्याने आपल्या नजरेसमोर हापूसला काय दर मिळाला, हे बागायतदाराला कळते. 

दरात वाढ
पिकवून आंबा विकला जात असल्याने बागायतदारांना त्याचा आर्थिक लाभ होऊ लागला आहे. ग्राहकालाही आपल्या पसंतीनुसार पिकलेला आंबा खरेदी करता येत असल्याने त्यांच्याकडून दराची घासाघीस होत नाही. यामुळे काही तासातच आंबा विकला जाऊन बागायतदाराची रक्‍कम मोकळी होते. तसेच वारंवार शहरात जाऊन आंबा विकला जात असल्याने ग्राहक आणि बागायतदार यांची ओळख वाढली आहे. यामुळे त्याचा लाभ बागायतदारांना आपला आंबा विकताना होत असल्याचे सांगितले जाते.

ऑनलाईन विक्री
ऑनलाईन मार्केटिंग हा आंबा विक्रीसाठी सक्षम पर्याय पुढे येत आहे. यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील ग्राहकांना थेटपणे अस्सल ‘देवगड हापूस’ आंबा घरबसल्या उपलब्ध होण्याची यातून संधी आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आंबा मागवता येतो. बॅंकांच्या सुलभ सुविधांमुळे रक्‍कम जमा करण्यातही काही अडचण जाणवत नाही. यातून ग्राहक आणि बागायतदारांचे नाते विकसित होण्यास मदत होत आहे. शहरातील ग्राहकांकडून ऑनलाईन आंबा मागणी वाढत असल्याचे दिसते. 

आंबा महोत्सवाचा लाभ
मुंबई, पुणेसह सोलापूर आदी प्रमुख शहरांत होणाऱ्या आंबा महोत्सवात येथील बागायतदार सामील होऊ लागले आहेत. यंदाही ठिकठिकाणी भरलेल्या आंबा महोत्सवात जिल्हाभरातील बागायतदार शेतकरी सहभागी झाले होते. महोत्सवामुळे हापूसची ओळख वाढवण्यास मदत झाली. बागायतदार आणि शेतकरी यांचे अनोखे नाते निर्माण झाले. अस्सल हापूस शहरातील ग्राहकांना अनुभवता येण्यास सहाय्य झाले.

पर्यटकांना आंबा
स्थानिक पातळीवर आंबा विक्री केंद्रात वाढ झाली. काही ठिकाणी बागायतदार आपल्या बागांमधूनच आंबा विक्रीस ठेवू लागले. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना आपल्या पसंतीनुसार आंबा मिळू लागला. येणारे पर्यटक पर्यटनस्थळांना भेटी देण्याबरोबरच आंबा खरेदीच्या अनुषंगाने आपले बेत आखू लागले. यामुळे अलीकडे स्थानिक पातळीवरील आंब्याची उलाढाल वाढल्याचे चित्र आहे.

मानांकनाचा फायदा
देवगड हापूस या नावाने आंब्याला मागणी वाढत आहे, मात्र त्याचा स्वतंत्र ब्रॅंड होण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा झाला. यामध्ये यश येऊन हापूसला जी. आय. मानांकन प्राप्त झाले. यामुळे देवगड हापूसला सुरक्षा कवच मिळाले. यामध्ये भविष्यात बागायतदारांबरोबरच ग्राहकांचाही फायदा आहे. यामुळे हापूसला चांगले दिवस येतील.

यंदाचा हापूस हंगाम तुलनेत चांगला झाला. पावसाअभावी सर्व आंबा बागायतदारांच्या हाती आला. मध्यंतरी पाऊस झाला मात्र वारा नसल्याने आंब्याला नुकसान पोचले नाही. अखेरच्या टप्प्यात आंबा उत्पादन वाढले. यामुळे दरात काहीशी घसरण झाली. प्रक्रिया उत्पादनासाठी यंदा मुबलक आंबा मिळाला. आंब्याचे साक्‍याचे प्रमाण कमी राहिले. पिकवून आंबा विकण्यावर बागायतदारांनी भर दिला. बागायतदारांना कामगार समस्या भेडसावली.
- ॲड. अजित गोगटे अध्यक्ष, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था

फळबाजारात यंदा कोकणसह परराज्यातील आंबा आवक सुमारे ४० टक्क्‍यांनी वाढली. एकदम आंबा फळबाजारात आल्याने दराची घसरण झाली. यामुळे फळबाजार मंदावला होता. यंदा सरसकट सर्व बागायतदारांकडे आंबा उत्पादन वाढले. छोट्या, मोठ्या बागायतदारांकडे आंबा उत्पादन झाले, मात्र पावसाअभावी सर्व आंबा शेतकऱ्यांचा हाती आल्याने बागायतदारांचे नुकसान टळले. काही प्रमाणात आंब्यावर थ्रीप्स्‌, खारीचा प्रादुर्भाव होता. थ्रीप्स्‌चा ॲटॅक बागायतदारांना वेळीच कळला नाही, तर नुकसान होते. 
- संजय पानसरे, आंबा व्यापारी, वाशी फळबाजार

यंदा आंबा उत्पादन तुलनेत अधिक झाले. यामुळे कॅनिंग व्यवसाय तेजीत गेला. दरवर्षीपेक्षा साधारणतः दुप्पट आंबा कॅनिंगसाठी उपलब्ध झाला. वाशी फळबाजारातील झालेल्या दराच्या घसरणीमुळे आंबा कॅनिंगकडे वळला. यंदा सुमारे ३ हजार टन आंबा प्रक्रिया उद्योगाला मिळाला. बागायतदारांना सरासरी २३ रुपये प्रतिकिलो दर मिळाला.
- मंगेश वेतकर, कॅनिंग व्यावसायिक, पडेल

यंदाचा आंबा हंगाम चांगला झाला. हापूसचे उत्पादन चांगले झाले, मात्र उत्पादन वाढण्याच्या तुलनेत अपेक्षित दर मिळाला नसल्याने बागायतदारांना त्याचा फटका सहन करावा लागला. दराच्या घसरणीमुळे उत्पादन वाढीचा लाभ झाला नाही. यामुळे उत्पादन वाढल्यावर त्यासाठी आवश्‍यक बाजारपेठ उपलब्ध होण्याची गरज आहे. यंदा आंब्यावर कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी जाणवला. मेमध्ये अखेरच्या टप्प्यात आंबा मुबलक झाला.
- जनार्दन तेली, ज्येष्ठ आंबा बागायतदार, वाघोटण

Web Title: konkan news mango rate