मांगेलीतील वर्षा पर्यटनासाठी सुविधांची गरज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

दोडामार्ग - मांगेलीतील वर्षा पर्यटनाला पायाभूत सुविधांचा अडसर आहे. आवश्‍यक सुविधा नसल्याने अपेक्षित गतीने पर्यटन व्यवसाय वाढण्यास मर्यादा येत आहेत.

दोडामार्ग - मांगेलीतील वर्षा पर्यटनाला पायाभूत सुविधांचा अडसर आहे. आवश्‍यक सुविधा नसल्याने अपेक्षित गतीने पर्यटन व्यवसाय वाढण्यास मर्यादा येत आहेत.

गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील मांगेली गाव निसर्गसंपन्न आहे. पश्‍चिम घाट म्हणजे जैववैविध्यतेची खाणच! त्या जैववैविध्यतेसोबत कर्नाटक सिमेवरच्या कड्यावरून कोसळणारा पांढराशुभ्र प्रपात पर्यटकांना साद घालत आहे. उंचावरचे थंड हवेचे ठिकाण, हिरव्याकंच डोंगररांगा, त्यातून प्रवाहित झालेले धबधबे हे मांगेलीचे पर्यटनस्थळ म्हणून बलस्थान आहे. यामुळे अनेक पर्यटक हजेरी लावतात. कुणी धबधब्यावर मनसोक्त आंघोळ करण्यासाठी येते तर कुणी सुटी ‘एन्जॉय’ करण्यासाठी आणि रोजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनातून दूर येत काही विरंगुळ्याचे क्षण जगण्यासाठी येते.  कारणे काहीही असली तरी सर्वांनाच मांगेलीतील निसर्ग आणि धधबधबा खुणावत राहतो.

वर्षा पर्यटन आणि पर्यटन उद्योग व्यापक स्तरापर्यंत नेण्याची क्षमता मांगेलीतील धबधबा आणि निसर्गरम्य परिसरात असली तरी अनेक असुविधा पर्यटन विकासात अडथळा ठरत आहेत. मुख्य रस्त्यावरून धबधब्यावर जाण्याची वाट जंगलातून, दगड धोंड्यातून जाते. महिला पर्यटकांसाठी आवश्‍यक चेंजिंग रूम नसल्याने महिला पर्यटकांची गैरसोय होते. पर्यटन उद्योगाची भरभराट होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.

पार्किंगचा प्रश्‍न
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तळेवाडी ते फणसवाडी रस्ता केल्याने पर्यटकांची वाहने धबधब्यापर्यंत पोचत आहेत. गावकऱ्यांनी पार्किंग स्थळासाठी जागा दिल्याने पार्किंगचा प्रश्‍न मिटला आहे. अन्य सुविधांसाठी निधी देण्याचीय तयारी श्री. केसरकर, खासदार विनायक राऊत यांनी दाखवली आहे. प्रश्‍न आहे तो आवश्‍यक तेथे जागा उपलब्धतेचा. त्या संदर्भात श्री. केसरकर यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली आहे. पर्यटन उद्योग भरभराटीस येण्यासाठी ग्रामस्थांनी एकजूट करून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.

Web Title: konkan news mangoli tourist