संपादित जागा कधीही ताब्यात घेणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

खेड - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्या लाभार्थींनी १७ जूनच्या आत मोबदल्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी केले आहे. १७ जूननंतर शासन संपादित केलेल्या जागा कधीही ताब्यात घेऊ शकते, असेही सोनोने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

खेड - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्या लाभार्थींनी १७ जूनच्या आत मोबदल्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी केले आहे. १७ जूननंतर शासन संपादित केलेल्या जागा कधीही ताब्यात घेऊ शकते, असेही सोनोने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला देण्याची प्रक्रिया गेले काही दिवस सुरू आहे. खेड तालुक्‍यातील एकूण १८०० शेतकऱ्यांचे प्रस्ताव महसूल विभागाकडे आले असून, उपलब्ध झालेल्या निधीतून सुमारे १२ कोटींचे वाटपही झाले आहे. महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या काही प्रस्तावांची छाननी करताना काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यांची पुनर्छाननी करून त्या खातेदारांचे पैसे त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. काही लाभार्थींनी सादर केलेल्या प्रस्तावांत अनेक अडचणी आहेत. सात-बारावर एकपेक्षा जास्त नावे असलेल्या प्रस्तावात अडचणी सर्वाधिक आहेत. काहींचे कोर्टात दावे सुरू आहेत, तर काहींचे वारस तपास झालेले नाहीत. ज्यांचे वारस तपास झालेले नाहीत, त्यांनी आता वारस तपासासाठी अर्ज केलेले आहेत. काही लाभार्थीच्या घराचा असेसमेंट उतारा एकाच्या नावाने तर घराखालची जमीन दुसऱ्याच्याच नावाने आहे. त्यामुळे खरा लाभार्थी कोण, याबाबत साशंकता आहे.

काही लाभार्थी हे परदेशात वास्तव्यास आहेत. त्यांचे पत्ते शोधण्याचे काम सुरू आहेत; परंतु काहींचे पत्ते अद्याप मिळालेले नाहीत. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या ठिकाणी नोकरी-धंद्यानिमित्ताने स्थायिक झालेल्या खातेदारांना प्रस्ताव सादर करण्यास अद्याप वेळ मिळालेला नाही. एकूण लाभार्थींपैकी सुमारे ४० टक्के लाभार्थीनी अद्याप प्रस्ताव सादर केलेले नाहीत. जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी जे प्रस्ताव सादर करावयाचे आहेत त्याची मुदत १७ जूनला संपत आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळेल की नाही हे सांगता येत नसल्याने लाभार्थीनी १७ जूनपूर्वी मोबदल्याचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन प्रांताधिकारी सोनोने यांनी केले आहे.

दृष्टिक्षेप...
खऱ्या लाभार्थ्यांचा शोध सुरू
परदेशात राहणाऱ्यांची छाननी
महसूलकडे १८०० प्रस्ताव
घर एकाचे, जमीन दुसऱ्याच्या नावे

Web Title: konkan news Mumbai-Goa highway