मुंबई-गोवा महामार्गावर हालच हाल 

अमित गवळे 
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

पाली - ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गाला चांद्रभूमीचे स्वरूप आले आहे. खड्ड्यांच्या जोडीलाच आता खडी, दगड, चिखलाचा राडारोडा महामार्गावर पसरल्याने वाहनचालकांना दिव्य पार पाडल्यासारखे वाटत आहे. हीच स्थिती राहिल्यास गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचे पुरते हाल होणार आहेत. 

पाली - ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गाला चांद्रभूमीचे स्वरूप आले आहे. खड्ड्यांच्या जोडीलाच आता खडी, दगड, चिखलाचा राडारोडा महामार्गावर पसरल्याने वाहनचालकांना दिव्य पार पाडल्यासारखे वाटत आहे. हीच स्थिती राहिल्यास गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचे पुरते हाल होणार आहेत. 

महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम कासवगतीने सुरू आहे. पावसामुळे बहुतांश ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील महिन्यात ‘सकाळ’ने या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. रक्षाबंधन व नारळीपौर्णिमेचा सण आल्याने महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढणार आहे. वाहनचालक, प्रवाशांची पुरती गैरसोय होणार आहे.

पाऊस सतत चालू राहिल्यास रस्ता दुरुस्तीच्या कामात अडचणी येऊ शकतात. खड्डे भरण्यासाठी ठोस उपाययोजना न करता, दगड, खडी, मातीचा वापर केल्यास परत खड्डे पडून रस्त्याची अधिकच दुरवस्था होईल. परिणामी, वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळून प्रवास यातनामय होणार आहे.

दुचाकीस्वारांची सर्वाधिक कसरत 
महामार्गावरील खड्डे, राडारोडा आणि चिखलातून मार्ग काढताना सर्वाधिक कसरत दुचाकीस्वारांना करावी लागत आहे. मोठ्या किंवा अवजड वाहनांच्या मागून जाताना चिखल व बारीक खडी उडून दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जाते. त्यामुळे त्याला समोरील काही दिसत नाही. खड्ड्यांतून बाहेर आलेली बारीक खडी व चिखलामुळे घसरून दुचाकीस्वार कोसळत आहेत. यात अनेक जण जखमी होत आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघातही होतात.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांना स्विमिंगपुलाचे स्वरूप आले आहे. प्रवाशांना आंघोळीची सोय झाल्याप्रमाणे वाटत आहे. खड्ड्यांच्या जोडीला आता चिखल आणि राडारोडा छळत आहे. प्रवास करणे जिकिरीचे, धोकादायक झाले आहे.

गणेशोत्सवाआधी खड्डे बुजविण्यासाठी काही ठोस उपाययोजना किंवा पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- किशोर देशपांडे, गोरेगाव विभाग  अध्यक्ष, मनसे

मलमपट्टीने वाढले दुखणे!
खड्डे बुजविण्यासाठी मोठे दगड, खडी, वाळू व माती टाकली जाते. अशा प्रकारे तात्पुरती मलमपट्टी केल्याने हे मिश्रण खड्ड्यांच्या बाहेर पडून रस्त्यावर येते. खड्डे पुन्हा अधिक मोठे होतात व सर्वत्र खडी आणि चिखल पसरतो.

Web Title: konkan news mumbai- goa highway pothole