अंतराच्या निकषावर शाळा बंदचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

तीन वर्षांत जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या सहा ते दहा हजाराने घटलेली आहे.

रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून शासनाच्या तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. शून्य ते दहा पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेने सुरू केल्याने जिल्ह्यातील 246 शाळांवर गंडांतर येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन शाळांमधील अंतर एक किलोमीटर असेल, तर त्यातील कमी पटसंख्येची शाळा पहिल्या टप्प्यात बंद करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे.

तीन वर्षांत जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या सहा ते दहा हजाराने घटलेली आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये आधुनिक शिक्षण प्रणालीचा अवलंब करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे; परंतु त्याचा तितकासा फायदा झालेला नाही. जिल्ह्यात शून्य ते वीस पटसंख्येच्या शाळांची संख्या आठशे आहे. दहापर्यंतच्या पटसंख्येची शाळा 246 आहे. या शाळा बंद करण्यासाठी शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत.

दोन शाळांमधील अंतर लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अडथळा होणार नाही, याची काळजी घेऊन शाळा बंदचा निर्णय घेतला जाणार आहे. कोकणातील दुर्गम भागात प्राथमिक शाळा शिक्षणाचा आधार आहेत. त्या बंद झाल्या तर अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी प्राथमिक शिक्षण विभागाने घेतली आहे. कमी पटाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक घेण्यात येणार आहे. तशा सूचना केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत.

Web Title: konkan news ratnagiri schools shut