पर्यटनस्थळी स्टंट करणाऱ्यांवर बडगा

राजेश कळंबटे 
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - आंबोली-कावळेसाद (सिंधुदुर्ग) पॉइंटवरून दोन पर्यटक पडून मृत्युमुखी पडल्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. कोकणातील धबधब्यांसह किनारी भागांवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने नजर ठेवून कायद्याचा दरारा निर्माण केला जाणार आहे. त्यामुळे स्टंटबाजी करून जीवघेणी कृत्ये करणाऱ्यांवर आळा घालता येईल, अशी माहिती एमटीडीसीचे सरव्यवस्थापक आशुतोष राठोड यांनी ‘सकाळ’ला दिली.

पावसाळ्यात कोकणातील निसर्गरम्य धबधब्यांवर उत्साही पर्यटकांची गर्दी जमते. या उत्साहाच्या भरामध्ये अनेक तरुण अनाकलनीय अशी कृत्ये करतात. काही पर्यटक धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी सरसावतात. अशा प्रसंगात जीव धोक्‍यात आहे, याची कल्पना असूनही जीव धोक्‍यात घालतात, असा अनुभव आला. त्यातून घडलेल्या दुर्घटनांचा त्रास स्थानिक प्रशासनाला बसतो. चार दिवसांपूर्वी असाच प्रकार आंबोली येथे घडला होता. त्या घटनेची क्‍लिप व्हायरल झाल्यानंतर दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात आले आहे. रत्नागिरीतील पानवल धबधब्यावरही गंभीर घटना घडली. त्यात एक पर्यटक जखमी झाला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या केसेसही पानवल येथे केल्या होत्या.

पर्यटनस्थळांवरील जीवघेणे प्रकार टाळण्यासाठी एमटीडीसी सरसावली आहे. त्या-त्या गावच्या हद्दीतील स्थानिक पोलिसांच्या मदतीने पर्यटकांवर नजर ठेवली जाणार आहे. कायद्याचा बडगा उगारला गेला, तर अशी कृत्ये घडणार नाहीत. तसेच दुर्घटना घडलीच, तर जखमींना तत्काळ उपचार मिळावा यासाठी ही ठिकाणे प्राथमिक आरोग्य केंद्रांशी जोडण्याचा विचार केला जात आहे. त्या घटनास्थळांजवळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. कोकणातील किनाऱ्यांवर वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. समुद्रात पोहायला जाणारे पर्यटक बुडण्याची शक्‍यता असते. रत्नागिरीत गणपतीपुळे, गुहागर, गावखडी, आंजर्ले, आरे-वारे अशा किनाऱ्यांवर जीवरक्षक नेमले जाणार आहेत. किनाऱ्यांवर औषधोपचारांची व्यवस्था, बचावाचे साहित्य, रुग्णवाहिका, ध्वनिक्षेपक उपलब्ध करून दिले जातील.

लोकसहभागातून किनारे किंवा पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात सविस्तर चर्चा केली जाईल.
- आशुतोष राठोड,    सरव्यवस्थापक, एमटीडीसी

Web Title: konkan news ratnagiri Tourist spot stunts