सैनिकी परंपरेचे प्रतीक शिवतरचा वीरस्तंभ

सैनिकी परंपरेचे प्रतीक शिवतरचा वीरस्तंभ

सैनिकांचा गाव अशी ओळख असलेली गावे ब्रिटिशकाळापासून खेड तालुक्‍यात आहेत. तेथील सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे प्रभावित होऊन गावाला काय पाहिजे, अशी विचारणाही गोऱ्या सरकारने केली होती. सैनिकांची ही परंपरा तालुक्‍यातील अनेक गावांत आजही सुरू आहे. मात्र हळूहळू तरुणांचा कल बदलतो आहे. सैनिक बनण्याचे प्रमाण कमी आहे. तरुणांची रग कायम असली तरी त्यांना निश्‍चित दिशा मिळत नाही, अशी खंत भारतीय लष्कर दिनानिमित्त माजी सैनिकांनी व्यक्त केली. खेड तालुक्‍यातील सैनिकांनी पूर्वी झालेल्या युद्धातून शौर्याची गाथाच देशासमोर मांडली आहे. गेल्या पाच-सहा दशकात खेड तालुक्‍यातून अनेक जण सैन्य दलात दाखल झाले. त्यापैकी काही जण युद्धभूमीवर शहीद झाले. तर काही जण निवृत्तीनंतर कालवश झाले. आजही काही माजी सैनिक म्हणून वावरत आहेत. त्यांचा वारसा अभिमानाने मिरवत वंशज आजही सैन्यदलात आहेत.
- सिद्धेश परशेट्ये, खेड

खेड - शिवतर हे शूरांचे गाव म्हणून ओळखले जाते. १९१४ ते १९१९ मध्ये झालेल्या पहिल्या महायुद्धात या एकाच गावातील २३४ जवान सहभागी झाले होते. त्यापैकी १८ जवानांची नावे उपलब्ध झाली. १९३९ ते १९४२ ला झालेल्या दुसऱ्या महायुद्धातदेखील शिवतर गावातील ६० जवान सहभागी झाले होते. यापैकी काही शहीद झाले, तर काही बेपत्ता झाले. या गावातील अनेकजण इंग्रज सैन्यात मोठमोठ्या पदावर होते. पहिल्या महायुद्धाच्या आधीपासूनच या गावाला सैन्याची परंपरा लाभली आहे. स्वातंत्र्यानंतरही आज घरपट लोक सैन्यदलात आहेत. शिवतर येथे ब्रिटिश सरकारने शहिदांच्या स्मृती जागविण्यासाठी वीरस्तंभ उभारला आहे. हा वीरस्तंभ गावातील तरुणांचे प्रेरणास्थान आहे.

१९१४ ते १९१९ च्या पहिल्या महायुद्धात जपानने हिंदुस्थानवर आक्रमण केले. त्यावेळी इंग्रजी फौजांमध्ये असणाऱ्या हिंदुस्थानी सैन्याने कडवी झुंज देत जपानी फौजांना परतवून लावले. त्या लढाईत शिवतर या एका गावातील २३४ जवानांनी सहभाग घेतला होता. हे जवान शहीद झाले. त्यापैकी केवळ १८ जवानांची ओळख पटविणे शक्‍य झाले होते. उर्वरित २१६ जवानांची माहिती अद्यापही त्यांच्या आताच्या पिढीला नाही. दुसऱ्या महायुद्धात देखील याच गावातील शहिदांचा समावेश आहे. या दोन महायुद्धांमध्ये सर्वांत जास्त कुठले सैनिक शहीद झाले, याची माहिती घेत असताना ब्रिटिश गव्हर्मेंटचे अधिकारी या गावात आले होते. तेव्हा आपला देश पारतंत्र्यातच होता. त्यांच्या वारसदारांना देखील तसेच पुढच्या पिढीला सोयी-सुविधा देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका त्या गव्हर्मेंट दाखविली. मात्र त्यावेळच्या निःस्वार्थी गावकऱ्यांनी केवळ गावच्या विकासाच्या दृष्टीने व आपल्या पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गावचा एक रस्ता व गावच्या वेशीवर एका वीरस्तंभाची मागणी ब्रिटिशांकडे केली. त्यामुळे त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यासह गावच्या वेशीवर एक पाषाणमध्ये वीरस्तंभ बांधून दिला. परंतु त्याची कालांतराने हानी झाली. मात्र तत्कालीन गृहराज्यमंत्री व  शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पुन्हा या वीरस्तंभाला नवसंजीवनी देत त्या ठिकाणी एक स्मारक उभे केले. आजही शिवतर हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते.

पहिल्या महायुद्धात शिवतर गावातील २३४ जवान शहीद झाले, तर काही बेपत्ता झाले. परंतु त्यापैकी फक्त १८ जणांची ओळख पटली. त्यांची नावे या रणस्तंभावर सुवर्णाक्षरांनी कोरण्यात आली आहेत.
१) हवालदार अमृत रामाजीराव मोरे
२) हवालदार महिपत परशुराम मोरे
३) शिपाई गोविंद आनंदराव मोरे
४) शिपाई नीलकंठ संभाजीराव मोरे
५) शिपाई अर्जुन गोविंद जाधव
६) शिपाई रामू पांडबाराव मोरे
७) शिपाई तातोजी भाऊराव मोरे
८) शिपाई सीताराम अप्पाजीराव मोरे
९) शिपाई बाबूराव केशवराव मोरे
१०) शिपाई बापूराव बाळाजीराव मोरे
११) शिपाई धोंडू नलावडे
१२) शिपाई रामचंद्र तातोजी खोपकर
१३) शिपाई गोविंद तातोजी खोपकर
१४) शिपाई तुकाराम गणू सुतार
१५) शिपाई बाबूराव धोंडबाराव मोरे
१६) शिपाई सहदेव रावजी कदम
१७) विठू कासार
१८) शिपाई धोंडबाराव बेलोसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com