मुख्यालय परिसरातील स्मृतिवन प्रशासनाच्या विस्मृतीत

नंदकुमार आयरे
बुधवार, 7 जून 2017

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय परिसरातच सुमारे दोनशे एकरहून अधिक क्षेत्रात दाभाचीवाडी तलावाच्या काठी प्रशस्त अशा ‘स्मृतिवना’ची निर्मिती करण्यात आली. स्मृतिवन विश्‍वस्त कार्यकारी मंडळ सिंधुदुर्गतर्फे या ठिकाणी आपल्या लाडक्‍या मृत व्यक्तीच्या नावाने एका वृक्षाची लागवड करण्याची संकल्पना राबविण्यात आली. त्यानुसार पहिल्या काही वर्षात हजारो वृक्षांची लागवडही झाली; मात्र या स्मृतीवनाकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने सद्य:स्थितीत ‘स्मृती’ जागवणारे ‘स्मृतिवन’च  विस्मृतीत गेले आहे.

सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण क्षेत्रात नयनरम्य अशा ठिकाणी दाभाचीवाडी तलावाच्या काठी हे स्मृतिवन साकारले आहे. सुमारे २०० एकरहून अधिक क्षेत्र असलेल्या या वनात विविध फळझाडे, विविध जातीचे वृक्ष आणि सुरूचे बन तयार केले आहे. सुरुवातीच्या काळात या ठिकाणी लोकांची गर्दी होत असे. आपल्या लाडक्‍या मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ देणगी देऊन वृक्ष लावला जात होता. हा वृक्ष म्हणजे मृत व्यक्तीच्या स्मृती जागवणारा म्हणून त्याचे जतन केले जात होते. यामुळे हा परिसर म्हणजे एक पर्यटन स्थळ  बनत होते. सुरुच्या बनातून वाहणारे वारे आणि आवाज यामुळे एक प्रकारचा आनंद, त्यातच कडेलाच असलेले रम्य असे दाभाचीवाडी तलाव यामुळे या स्मृतीवनाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत होती.

याच स्मृतीवनात भारताचे ‘तीन’ युद्धात यशस्वी कामगिरी करणारे ‘लढाऊ विमान’ जिल्ह्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांना पहाता यावे म्हणून ठेवले होते; मात्र या स्मृतीबनाकडेच प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने देशाची ‘शान’ असलेले विमान तेथे सडत पडले होते; मात्र याकडे प्रसार माध्यमांनी लक्ष वेधल्यानंतर ते विमान आता क्रीडा संकुलशेजारी प्रशासनाने स्थलांतरीत  केले आहे; मात्र स्मृतीबनाच्या देखभाल व स्वच्छतेकडे प्रशासकीय यंत्रणेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने याची दूरावस्था झाली आहे.

आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्मृती जतन करुन ठेवण्यासाठीची अतिशय चांगली संकल्पना असलेले स्मृतीवन गेल्या पंचवीस वर्षात दुर्लक्षीत राहिल्याने या ठिकाणी जंगलमय बनला आहे. या स्मृतीवनात कोणीही फिरकत नाही. या ठिकाणी कित्येक वर्षे कोणीही वरिष्ठ अधिकारी फिरकलेले दिसले नाही. एका बाजूला दाभाचीवाडी तलाव, दुसऱ्या बाजूला शासकीय विश्रामगृह तर अन्य बाजूंनी जिल्हा रुग्णालय व प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने अशा मध्यभागी असलेल्या स्मृतीवनाकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष करावा ही बाब सिंधुदुर्गनगरीवासियांना वेदना देणारी आहे. स्मृतीवनाची स्वच्छता कित्येक वर्षे झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी ‘स्मृती’ जागविणाऱ्या वृक्षापेक्षा स्मृती नष्ट करणाऱ्या जंगली वृक्षांची व वेलींची वाढ झालेली आहे. भविष्यात हे स्मृतीवन अभयारण्य तर बनणार नाही ना असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Web Title: konkan news sindhudurg nagari