...त्यांनी टंचाईचे चटके दूर करण्याचा शब्द दिला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

दोडामार्ग - मांगेली तळेवाडी ते फणसवाडी दरम्यानची तापलेली काळी सडक, रणरणते ऊन आणि दोन कळशा पेलवणार नाहीत म्हणून एकच कळशी डोक्‍यावर घेऊन अनवाणी पायाने घराच्या दिशेने जाणारी एक वृद्धा! अचानक समोरून येणारी एक आलिशान पांढरी गाडी तिच्या पुढ्यात थांबते आणि आतून उतरलेली व्यक्ती तिची आस्थेने विचारपूस करते. मग ती वृद्धा भडाभडा बोलते आणि पाणीटंचाईने हैराण झालेल्या, मैलोन्‌मैल पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या महिलांच्या व्यथा मांडते, स्वतः भोगलेल्या दुःखाची किनार त्या शब्दांना असते. 

दोडामार्ग - मांगेली तळेवाडी ते फणसवाडी दरम्यानची तापलेली काळी सडक, रणरणते ऊन आणि दोन कळशा पेलवणार नाहीत म्हणून एकच कळशी डोक्‍यावर घेऊन अनवाणी पायाने घराच्या दिशेने जाणारी एक वृद्धा! अचानक समोरून येणारी एक आलिशान पांढरी गाडी तिच्या पुढ्यात थांबते आणि आतून उतरलेली व्यक्ती तिची आस्थेने विचारपूस करते. मग ती वृद्धा भडाभडा बोलते आणि पाणीटंचाईने हैराण झालेल्या, मैलोन्‌मैल पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या महिलांच्या व्यथा मांडते, स्वतः भोगलेल्या दुःखाची किनार त्या शब्दांना असते. 

महिलांच्या वेदनांनी ती व्यक्तीही हेलावते आणि गदगदलेल्या स्वरांनी पुढच्या उन्हाळ्यात अशा रणरणत्या उन्हात तुम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, असा शब्द देऊन निघून जाते. त्या पाठमोऱ्या गाडीकडे पाहत नव्या आशा डोळ्यात साठवून मग ती वृद्धाही घराच्या दिशेने पुन्हा चालू लागते.

या प्रसंगातील ती वयोवृद्धा महिला आहे पार्वती शंकर नाईक आणि पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा शब्द देणारी व्यक्ती आहे खासदार विनायक राऊत! तळेवाडी ते फणसवाडी दरम्यान एक वाडी लागते. त्या वाडीत श्रीमती नाईक राहतात. त्यांच्या वाडीवर पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यामुळे तळेवाडीतील तळ्यावरुन सुमारे दीड दोन किलोमीटरची पायपीट करत त्यांना पाणी आणावे लागते. तळेवाडीपासून तीन साडेतीन किलोमीटरवरील फणसवाडीतही पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. त्याची पाहणी करण्यासाठी खासदार राऊत मद्दामहून फणसवाडीला गेले होते. तेथून परततांना त्यांना भर उन्हात पाण्याची घागर घेऊन जाणाऱ्या श्रीमती नाईक दिसल्या आणि त्यांनी गाडी थांबवून त्यांची आस्थेने चौकशी केली.

आतापर्यंत या मतदारसंघाने अनेक खासदार दिले; पण एका टोकाला असलेल्या मांगेलीला कुणी भेट दिली नाही, ना कुणी तिथल्या लोकांचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला. खासदारांचा दौरा म्हणजे पाच पन्नास गाड्यांचा ताफा आणि कार्यकर्त्यांची भाऊगर्दी. सर्वसामान्यांशी बोलायला, त्यांचे दुःख समजून घ्यायला त्यांना वेळ नाही आणि सर्वसामान्यांनी त्यांची भेट घेऊन व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला तर कार्यकर्त्यांची आणि अंगरक्षकांची फौज आडवी यायची, जणू अभेद्य तटबंदी! पण खासदार राऊत यांच्या दौऱ्यात तसले काहीच नव्हते. लोकांचे प्रश्‍न लोकांमध्ये गेल्याशिवाय समजणार नाहीत. कार्यकर्त्यांच्या किंवा प्रशासनाच्या माध्यमातून येणारी माहिती शंभर टक्के खरी किंवा बरोबर असेलच असे नाही. त्यामुळे श्री. राऊत खुद्द फणसवाडीत पोचले. तेथे कुठल्याही सुरक्षाकवचाचा अडसर गावकऱ्यांसाठी नव्हता. कौटुंबिक वातावरणात गावकऱ्यांनी, महिलांनी आपले प्रश्‍न मांडले. त्यानंतर रस्त्यातील श्रीमती नाईक आणि श्री. राऊत यांची भेट तर खूप काही सांगून जाणारी. एवढा मोठा खासदार आपल्या गावात येतो, आपले प्रश्‍न समजून घेतो याचे अप्रुप आणि आनंद जसा फणसवाडीवासियांच्या चेहऱ्यावर होता, तेच अप्रुप आणि आनंद श्रीमती नाईक यांच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळाले.

दिलासादायक संदेश
अर्थात त्यांच्या दौऱ्यानंतर अनेकजण टीकाही करतील. खासदारांनी त्यांना आश्‍वासनेच दिली, आधी पाणी प्रश्‍न सोडवा, मग आम्ही सत्कार करू वगैरे वगैरे. पण ज्या गावात आतापर्यंत कधीच कुठला खासदार गेला नाही, त्या गावात खासदार राऊत पोचले तरी. लोकांचे प्रश्‍न समजून घेतले आणि सोडविण्याचा शब्दही दिला. प्रशासनाने पाणीटंचाई निवारण्यातील अडचणींचा पाढा वाचला, त्याची खातरजमा त्यांनी फणसवाडीत स्वतः भेट देऊन केली. आतापर्यंत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने फणसवाडीवासीयांना एवढंसुद्धा दिलं नव्हतं. त्यामुळे खासदार राऊत यांची फणसवाडीतील भेट आणि श्रीमती नाईक यांच्याशी गाडी थांबवून केलेला संवाद नक्कीच राजकीय इच्छाशक्ती बदलत असल्याचा उत्साहवर्धक व दिलासादायक संदेश देणारा आहे, असे म्हणावे लागेल.

Web Title: konkan news sindhudurg news water