मैदानावरचे शिक्षक उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

रत्नागिरी - सहावी ते बारावीपर्यतच्या शालेय अभ्यासक्रमात कला व क्रीडाच्या पुरेशा तासिका वेळापत्रकात समाविष्ट कराव्यात या मागणीसाठी आज जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेने रत्नागिरीत मोर्चा काढला. मैदानावर विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक प्रथमच रस्त्यावर उतरून मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

रत्नागिरी - सहावी ते बारावीपर्यतच्या शालेय अभ्यासक्रमात कला व क्रीडाच्या पुरेशा तासिका वेळापत्रकात समाविष्ट कराव्यात या मागणीसाठी आज जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेने रत्नागिरीत मोर्चा काढला. मैदानावर विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक प्रथमच रस्त्यावर उतरून मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

शासनाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून शालेय वेळापत्रकातून क्रीडा, कला विषयांच्या तासिका कमी करून आठवड्यातून केवळ दोनच तासिका ठेवल्या आहेत. यापूर्वी तीन तासिका ठेवल्या होत्या. तासिका कमी केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सद्यःस्थितीत क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयासाठी सुमारे ३०० शिक्षक कार्यरत आहेत. ते शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात. हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सकाळी मारुती मंदिर येथून या मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांची भेट घेऊन त्यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. त्यानंतर घोषणा देत मोर्चा परिषद भवनवर आला. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात कार्यालयीन अधीक्षकांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसीलदार प्रणाली आवरे यांनी निवेदन स्वीकारले.

सर्वांगीण विकासासाठी प्रथम शरीर सुदृढ असणे आवश्‍यक आहे. मोकळ्या मैदानात विद्यार्थ्याना मुक्त हालचाली करू देणे महत्त्वाचे आहे. वेळापत्रकात या विषयांना पुरेशा तासिका उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु शैक्षणिक वर्षात तासिका कमी करण्यात आल्या. आठवड्यातील सहा दिवसांत तीन तासिका खेळासाठी मिळू नये, ही खेदाची बाब आहे. शालेयस्तरावरील अनेक खेळाडू भविष्यात क्रीडाशिक्षक किंवा क्रीडा मार्गदर्शक ठरतात. या विषयांच्या तासिका कमी केल्याने शाळांमधील शिक्षकही अतिरिक्त ठरणार आहेत. नोकरी टिकविण्यासाठी टांगती तलवार आहे. टीईटीसारख्या परीक्षा शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असतानाच क्रीडा व शारीरिक शिक्षकांना त्या बंधनकारक नाहीत. भविष्यात या शिक्षकांची गरज नाही, असा आरोप करण्यात आला. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदयराज कळंबे, उपाध्यक्ष प्रसाद शिवणेकर, सत्यवान धोत्रे, सचिव राजेश जाधव यांच्यासह अनेक शिक्षक सहभागी होते.

Web Title: konkan news teacher