Konkan : कोकण रेल्वे मार्गावरील ‘डबल डेकर’ होणार इतिहासजमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan

Konkan : कोकण रेल्वे मार्गावरील ‘डबल डेकर’ होणार इतिहासजमा

खेड : सात वर्षांपूर्वी कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेसची ‘डबल डेकर’ ही ओळख काळाच्या पडद्याआड जाणार आहे. या गाडीत वरती आणि खालती बसण्यासाठी केलेल्या विशिष्ट व्यवस्थेमुळे ती आकर्षण बनली होती. आता द्विसाप्ताहिक आणि साप्ताहिक अशा चालणाऱ्या दोन डबल डेकरचे विलिनीकरण करण्यात येणार असून त्या ४ नोव्हेंबर २०२२ पासून नव्याने चालवण्यात येणार आहेत; मात्र डबल डेकर आसनव्यवस्था असलेला डबा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून ही गाडी एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे.

गाडी क्र. ११०८५ आणि ११०८६ लोकमान्य टिळक टर्मिनस– मडगाव वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेस (द्वि-साप्ताहिक) आणि गाडी क्र. ११०९९ आणि १११०० लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एसी डबल डेकर एक्स्प्रेस (साप्ताहिक) यांचे विलिनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेमधील अधिकाऱ्यांनी दिली. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ४ नोव्हेंबरपासून दर गुरुवारी, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्यरात्री ००.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी सकाळी ११.३० वा. पोहोचेल. ही गाडी ४ नोव्हेंबरपासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दुपारी १२.४५ वा. मडगाव येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री २३.४५ वा. पोहोचेल, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

कोकण रेल्वेमार्गावर २०१५ मध्ये पहिली वातानुकूलित डबल डेकर गाडी सुरू करण्यात आली होती. आसन प्रकारातील आठ डब्यांची लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमाळीदरम्यान धावणारी ट्रेन रेल्वे मडगावपर्यंत चालवण्यात येऊ लागली. आठवड्यातून तीन दिवस धावणारी डबल डेकर ट्रेन गणेशोत्सवात प्रथमच प्रीमियम म्हणून चालवण्यात आल्याने भाडे अव्वाच्यासव्वा वाढले आणि कोकण मार्गावरील प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली होती. त्यानंतर दिवाळीत नियमितपणे गाडी सुरू करतानाच प्रीमियम पद्धत हटवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला.