कोकण रेल्वेचे वेळापत्रक हळूहळू रुळावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

रत्नागिरी - मध्य रेल्वे मार्गावर आपटा-जिते मार्गावरील कोसळलेली दरड आणि मुंबईत पाणी भरल्यामुळे गेले दोन दिवस खोळंबलेली कोकण रेल्वे हळूहळू रुळावर येण्यास सुरवात झाली आहे. रद्‌द केलेल्या गाड्या सोमवारी (ता. 5) मुंबईहून सोडण्यात आल्या तर मडगावहून सात गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

रत्नागिरी - मध्य रेल्वे मार्गावर आपटा-जिते मार्गावरील कोसळलेली दरड आणि मुंबईत पाणी भरल्यामुळे गेले दोन दिवस खोळंबलेली कोकण रेल्वे हळूहळू रुळावर येण्यास सुरवात झाली आहे. रद्‌द केलेल्या गाड्या सोमवारी (ता. 5) मुंबईहून सोडण्यात आल्या तर मडगावहून सात गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रकाला बसला. जिते येथील भूस्खलनानंतर या मार्गावरील नऊ गाड्या रद्‌द केल्या तर काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या. मुंबईहून सुटलेल्या गाड्याही कुर्मगतीने पुढे सरकत होत्या. 3 ऑगस्टच्या तीन गाड्या, 4 ऑगस्टच्या सुटलेल्या चार गाड्या रेनीगुंटा मार्गे तर पाच गाड्या भोपाळ मार्गे वळविण्यात आल्या. 5 ऑगस्टला मध्यरात्री सुटलेली तिरुनवेल्ली - जामनगर एक्‍स्प्रेस रेनीगुंटामार्गे, कोचुवेल्ली - चंडीगढ केरळ संपर्क क्रांती एक्‍स्प्रेस रेनीगुंटा मार्गे वळववण्यात आली. तसेच केरळ संपर्क क्रांती एक्‍स्प्रेस, कोईम्बतूर - हिसार साप्ताहीक एक्‍सप्रेस, राजधानी एक्‍प्रेस, कोचुवेली - गंगानगर साप्ताहीक एक्‍स्प्रेस या 3 व 4 ऑगस्टला सुटलेल्या गाड्या दहा ते बारा तास उशिराने धावत होत्या.

कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्या रद्‌द केल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. रविवारी (ता. 4) मडगावहून सुटलेल्या गाड्या पुढे सुरु ठेवण्यात आल्या होत्या. सोमवारी (ता. 5) बहुतांश गाड्या कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या होत्या. त्यात जनशताब्दी, राजधानी, मत्स्यगंधा, मेंगलोर- मुंबई एक्‍स्प्रेस, तुतारी एक्‍स्प्रेस, कोकणकन्या एक्‍स्प्रेस यासह रत्नागिरी- दिवा या गाड्यांचा समावेश आहे. तसेच मुंबईहून नेत्रावती एक्‍स्प्रेस, तुतारी एक्‍स्प्रेस, कोकणकन्या एक्‍स्प्रेस, मत्स्यगंधा एक्‍स्प्रेस, मेंगलोर एक्‍स्प्रेस सोडण्यात आल्या. मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आल्यामुळे कोकण रेल्वेवर भर होता.

रेल्वे सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरु असताना कोकण रेल्वे मार्गावर कोणतीही दुर्घटना घडणार नाही यासाठी प्रशासनाने लक्ष ठेवले होते. जिते येथे दुर्घटना घडल्यानंतर सुटलेल्या गाड्या न थांबवता त्या जिते स्थानकापर्यंत पुढे सुरु ठेवण्यात आल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Railway timetable now on way