#KonkanRain त्या चौघांनी अनुभवला मृत्युचा थरार 

#KonkanRain त्या चौघांनी अनुभवला मृत्युचा थरार 

दोडामार्ग - पुराचे पाणी आलेल्या पुलावर आज मर्सिडीज बेंझ मोटार अडकून चौघा युवकांनी मृत्यूचा थरार अनुभवला. साटेली भेडशी येथील पुलावर आज दुपारी ही घटना घडली. अन्य गाड्यातील प्रवासी आणि ग्रामस्थांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत मोटारीचे लॉक बाहेरून उघडले आणि चौघांची सुटका केली. 
मर्सिडीज बेंझ गाडीतून चौघा युवकांनी पुलावर आलेल्या पाण्यात गाडी घातली आणि अर्ध्या रस्त्यातच ती बंद पडली.

पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून जाऊ लागली; मात्र स्थानिक आणि अन्य प्रवाशांनी त्यांना महत्तप्रयासाने सुरक्षीत बाहेर काढले. ती गाडी साटेली भेडशीहून गोव्याला जात होती. मोहन कोरगावकर यांच्या मालकीची ती गाडी आहे, अशी माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली. 

तालुक्‍यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे साटेली भेडशीतील कॉजवे पाण्याखाली गेला होता. त्या पुलावरुन दुपारी चारच्या दरम्यान आलेल्या गाड्यांच्या ताफ्यात मर्सिडिज बेंझही होती. ही महागडी मोटार पाण्यात गेल्यामुळे तिची इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणा बंद पडली आणि गाडी आपोआप लॉक झाली. त्यामुळे चौघा युवकांना बाहेर पडता येत नव्हते. पुलावर नदीचे पाणी तर वाढत होते. अखेर त्यांच्या पुढे गेलेल्या गाडीतील प्रवाशांसह स्थानिकांनी तेथे धाव घेतली. या सर्वांनी बाहेरून लॉक काढत त्या चौघांना मोटारीबाहेर घेत त्यांचा जीव वाचवला. त्यानंतर मोटार वाहून जाऊ नये म्हणून तारेने बांधून ठेवली. वाढत गेलेले पाणी शेवटी मोटारीच्या टपापर्यंत पोचले होते. पोलिसांनी आणि तहसीलदार ओंकार ओतारी, नायब तहसीलदार एन. एन. देसाई आदींनी घटनास्थळी भेट दिली. 

श्री. ओतारी यांनी त्यानंतर बांधकामचे उपअभियंता आणि शाखा अभियंता विजय चव्हाण यांना तहसीलमध्ये बोलावून घेतले. रस्ता, पूल याबाबतच्या समस्या तत्काळ सोडावा, साटेली भेडशी पर्यायी रस्त्यावर पडलेले झाड तोडा, आदी सूचना त्यांना केल्या. 
दरम्यान, दोडामार्ग- विर्डी मार्गावरील वझरे येथील पूल पाण्याखाली गेल्याने दुपारपासून वाहतूक ठप्प होती. पुलावर पाणी असल्याने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुले दोन्ही बाजूला अडकून पडली होती. शिवाय दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुलावर दुपारी एक वाजता आलेले पाणी सायंकाळी साडेपाचपर्यंत ओसरले नव्हते. त्यात पावसाची संततधार कायम आहे. 

तालुक्‍यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कमी उंचीचे सर्व पुल पाण्याखाली गेले आहेत. आयी, साटेली भेडशी, झरेबांबर, कसई म्हावळणकरवाडी, घोटगेवाडी येथील पूल पाण्याखाली गेले. दोडामार्ग, वझरे, तळेखोल, विर्डी या मार्गावरील वझरे हळदीचा गुंडा दरम्यानचा पुल पाण्याखाली गेल्याने अनेकांची गैरसोय झाली. हळदीचा गुंडा प्राथमिक शाळेत जाणारी वझरेतील मुले पलिकडे अडकून पडली होती. माटणे हायस्कूलमध्ये जाणारी मळावाडीमधील मुले वझरेत अडकून पडली. पाऊस मुसळधार असल्याने पुलावर पाणी येण्याची शक्‍यता असल्याने पालकांनी हायस्कूलमधील मुलांना घरी नेण्याची घाई केली; पण पुलावर पोचेपर्यंत पूल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे त्यांना अडकून पडावे लागले. पलिकडून जवळपास पंचवीस मुले हायस्कूलमध्ये येतात. त्यांचे हाल झाले. 

या मार्गावरुन जाणारी वाहने गोव्यातून ये-जा करतात. गोव्याला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. आयी पुलावर पाणी असल्याने तळेखोल विर्डी कडे जाणाऱ्यांचा मार्गही बंद झाला. त्यामुळे गोव्यातून विर्डीकडे जाणारे अनेक प्रवासी अडकून पडले. पुलाची उंची वाढवावी म्हणून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनांना बांधकाम विभागाने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात कमी उंचीचा तो पूल वझरे पंचक्रोशीसाठी डोकेदुखी ठरत आहे. 
अवजड वाहतूक आणि बांधकामचे दुर्लक्ष यामुळे तो पूल कमकुवत बनला आहे. त्याची उंची वाढवण्यासाठी किंवा नवा पूल बांधून मिळण्यासाठी पंचक्रोशीतून प्रयत्न होत असताना शासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. 

आंबोली घाटात वाहतुक ठप्प 
आंबोली - येथील घाटात सकाळी 11 वाजता चार चाकी गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. दोघे जखमी झाले. आंबोलीपासून पाच किलोमीटरवर शेवटच्या धबधब्याच्या वळणावर घडली. यामुळे दोन्ही बाजूनी वाहतूक कोंडी झाली. सुमारे तासभर वाहतूक बंद होती. यात स्थायी समितीच्या बैठकीसाठी येणारे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतींच्या गाड्या आंबोलीत अडकून पडल्या. 

मुले पडली अडकून 
दोडामार्ग, वझरे, तळेखोल, विर्डी मार्गावरील वझरे हळदीचा गुंडा दरम्यानचा पुल पाण्याखाली गेल्याने अनेकांची गैरसोय झाली. हळदीचा गुंडा प्राथमिक शाळेत जाणारी वझरेतील मुले पलिकडे अडकून पडली होती. माटणे हायस्कूलमध्ये जाणारी मळावाडीमधील मुले वझरेत अडकून पडली होती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com