#KonkanRains आंबोली घाट बनला कमजोर

#KonkanRains आंबोली घाट बनला कमजोर

आंबोली -  गेला आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील ब्रिटिशकालीन घाट कमजोर झाला आहे. ठिकठिकाणी धोकादायक बनलेल्या दरडी, रस्त्यावर येणारे पाण्याचे लोट आणि खासगी मोबाईल कंपनीसाठी खोदलेल्या चरामुळे भेगाळलेले कठडे, खचलेला रस्ता यामुळे या घाटाची अपरिमित हानी झाली.

या अतिवृष्टीत आंबोली घाटात मुख्य धबधब्यासमोर मोठ्या प्रमाणात रस्ता खचला. घाटात आणखी चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचला. दरीच्या बाजूने रस्ता खचला आहे. त्यामुळे घाटातून चारचाकी लहान गाड्यांची वाहतुक सुरू आहे. घाटात ठिकठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते. घाटातील रस्त्यावर दगड आणि माती आली होती. तूर्तास तात्पुरती डागडुजी करत या पाण्याची दिशा बदलली असली तरी घाट मात्र कमजोर झाला आहे. मोठ्या प्रमाणात युद्धपातळीवर रस्ता दुरूस्ती करावी लागणार आहे.

आंबोली घाटात मंगळवारी आंबोलीतून २ किलोमीटर खाली दरड कोसळली होती. ती हटवताना तेथेच आणखी दरड कोसळल्याचा प्रकार घडला. यातच काल (ता.८) पहाटे मुख्य धबधब्याच्या बाजूला असणाऱ्या धबधब्यात कठड्यावरून मोठा दगड पडला. त्यामुळे रेलिंग तुटले. धबधब्याच्या समोर वळणावर मोठ्या प्रमाणात दरीच्या बाजूने रस्ता खचला. त्यामुळे रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. तेथून फक्त चारचाकी व दुचाकी वाहने जावू शकतात. तेथून थोड्या अंतरावर घाटातील मुख्य दरडीच्या ठिकाणी दगड रस्त्यावर आले आहेत.

मुख्य दरडीपासून थोड्या अंतरावर रस्त्याच्या बाजूने घाट खचला आहे. ठिकठिकाणी मोरी खचल्या आहेत. त्यामुळे दरीच्या बाजूने रस्ता अनेक ठिकाणी कमकुवत झाला आहे. अनेक ठिकाणी घाटातील मोरी तुंबल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आले होते. ते काल रात्री एका बाजूला परतण्यात आले; पण ही तातपुरती व्यवस्था आहे. त्यातून दुचाकी चालवताना कसरत करावी लागत होती. घाटात अनेक ठिकाणी मातीच्या भागाची पडझड झाली आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळली ती तोडण्यात आली. पाऊस व वारा जास्त असल्याने घाटातून प्रवास करणे धोकादायक होते. घाटातील अवजड वाहतुक दोन दिवसापूर्वी बंद करण्यात आली होती.

गेले सहा दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने घाटमार्गाची पडझड झाली. गणेश चतुर्थी असल्याने या मार्गावरून बेळगाव, कोल्हापूर अशी व्यापारी वाहतुक जिल्ह्यातून वाढणार आहे. तिलारी घाट बंद असल्याने या घाटमार्गावरून वाहतुक वाढणार आहे. त्यामुळे उपाययोजना मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. मुख्य म्हणजे यावर्षी कठड्याचा भाग कोसळलेला नसून झाडे व मातीचा भाग खचला आहे.

मोबाईलसाठीची खोदाई अंगाशी
आंबोली घाटातून गेल्यावर्षी खासगी मोबाईल कंपनीसाठी केबल घालण्यात आली. दरीकडच्या भागात मोरीच्या बाजूला खोदकाम करण्यात आले. त्यामुळे दरीकडचा भाग, कठडे कमकुवत 
होऊन कोसळल्याचा आरोप होत आहे.

जुन्या आठवणींना उजाळा
आंबोलीत गेले आठ दिवस लाईट नाही. त्यामुळे जेवण करतानाही पाट्यावर मिरची वाटायची वेळ आली. तर बॅटरी चार्ज नसल्याने सर्वाचे मोबाईल बंद होते. गेले दोन दिवस मोबाईल टॉवर देखील बंद आहेत. शिवाय आठ दिवस मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. या संकट काळातही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com