
पुढील चार दिवसांत हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या.
esakal
हायलाइट्स (मुख्य मुद्दे)
सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कायम – सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि कणकवली तालुक्यांत सायंकाळी विजांच्या गडगडाटांसह जोरदार सरी कोसळल्या.
भातपीक कापणी रखडली – सततच्या पावसामुळे सुमारे १५ हजार हेक्टर भातपीकांपैकी ५ हजार हेक्टरवरील पीक संकटात, काही पिकांना कोंब फुटण्यास सुरुवात.
शेतकऱ्यांना सल्ला – १० ते ११ ऑक्टोबरनंतर दुपारी पाऊस कमी होण्याची शक्यता, तोपर्यंत कापणी टाळावी, असे मुळदे संशोधन केंद्राचे डॉ. यशवंत मुठाळ यांचे आवाहन.
Weather Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत विजांच्या गडगडाटांसह आज सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे जिल्ह्यात पाऊस कायम असून, सतत पडत असलेल्या पावसामुळे भातपीक कापणी रखडली आहे.
जिल्ह्यात पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. काही भागांत मंगळवारी (ता.७) सायंकाळी बरसल्यानंतर आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती. काही भागांत कडक उन्हदेखील होते; परंतु सायंकाळी चारच्या सुमारास सावंतवाडी तालुक्यात विजांचा गडगडाट सुरू झाला. त्यानंतर सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या भागात वीस मिनिटांपेक्षा अधिक पाऊस झाला.