अनधिकृत पर्ससीनचे पालकमंत्री कॅप्टन - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

कुडाळ - 'पालकमंत्री दीपक केसरकर हे अनधिकृत पर्ससीननेट मासेमारीचे कॅप्टन आहेत. आमच्यावर त्यांनी कितीही "केसेस' टाकल्या तरी मागे हटणार नाही. पारंपरिक मच्छीमारांचे आम्ही शिपाई आहोत. त्यांच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहणार. अनधिकृत पर्ससीननेट मासेमारी थांबली नाही तर उग्र आंदोलन करू. प्रसंगी किनारपट्टी पेटवू. या स्थितीस आम्ही जबाबदार नाही,'' असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी मंगळवारी येथे दिला.

मालवण येथील सहायक मत्स्य आयुक्तांवर बांगडाफेक आंदोलनप्रकरणी राणे समर्थकांसह पोलिसांत हजर झाले. येथील न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. यानंतर एमआयडीसी विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे म्हणाले, ""आम्हा सर्वांना आज जामीन मिळाला. आजची घटना जिल्ह्यातील लोकांमध्ये योग्य तो संदेश देणारी ठरली. आतापर्यंत पारंपरिक मच्छीमारांसमवेत शिवसेना खंबीरपणे उभी आहे, असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न झाला होता. किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छीमारांवर मात्र अन्याय होतच होता. मोठ्या प्रमाणात अनधिकृत पर्ससीननेट सुरूच होते. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी या मच्छीमारांचा फक्त निवडणुकीपुरता फायदा घेतला. सत्तेत असूनही गेली तीन वर्षे ते या मच्छीमारांवरील अन्याय दूर करू शकले नाहीत.''
चौकट

किनारा करणार सीसीटीव्ही चित्रण
किनारपट्टीवर कोणाच्या आशीर्वादाने काय चालते, पोलिस, पालकमंत्री, खासदार, आमदार काय करतात, याचे चित्रण आम्ही सीसीटीव्ही कॅमेराने करणार आहोत. त्यासाठी किनारपट्टीवर सीसीटीव्ही कार्यान्वित करू. आमची लढाई आणखी तीव्र करणार, असा इशारा राणे यांनी या वेळी दिला.

Web Title: kudal konkan news nitesh rane talking