घावनळेच्या ग्रामसभेत हाणामारी

घावनळेच्या ग्रामसभेत हाणामारी

कुडाळ - घावनळे ग्रामपंचायतीची मंगळवारची (ता. १५) ग्रामसभा ग्रामसभाध्यक्ष निवडीवरून वादळी ठरली. यात धक्काबुक्कीसह जिल्हा परिषदेच्या सदस्या अनुप्रीती खोचरे यांच्यावर एका गटाने अंगावर खुर्ची फेकली. पोलिसांसमक्ष ही घटना घडली. उपसरपंचांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून सभा स्थगित करण्याबाबत सांगितले; मात्र उपस्थित असणाऱ्या एका गटाला हे मान्य झाले नाही. अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार तब्बल चार तासांनी ही  ग्रामसभा झाली.

मंगळवार (ता. १५) स्वातंत्र्यदिनी घावनळे ग्रामपंचायत येथे ग्रामसभेचे आयोजन केले होते. सुरवातीला महिला ग्रामसभा झाली. त्यानंतर सव्वाअकराच्या दरम्यान ग्रामसभेच्या कामकाजाला सुरवात होण्यापूर्वीच ग्रामसभाध्यक्ष निवडीचा विषय आला. एका गटाने मतदान प्रक्रियेची मागणी केली. त्याला दुसऱ्या गटाने मान्यता देताच त्या पद्धतीने मतदान प्रक्रिया होत असताना दुसऱ्या गटाची ताकद जास्त दिसू लागली. त्यांचा अध्यक्ष बसणार, तत्पूर्वीच या विषयावरून जोरदार वादाला सुरवात झाली. ग्रामसभेची कोणतीही प्रक्रिया न होता दोन गट समोरासमोर भिडले. यामध्ये एका गटाने संतोष नागवेकर, रामा कोकरे यांना मारहाण केली. तसेच, घावनळे जिल्हा परिषदेच्या सदस्या अनुप्रीती खोचरे यांच्यावर खुर्ची फेकण्याचा प्रकार झाला. सर्व घटना या पोलिसांसमक्ष झाल्या.

विशेष म्हणजे या ग्रामसभेच्या पार्श्‍वभूमीवर खोचरे यांनी ग्रामसभेला पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी पोलिस निरीक्षक भोसले यांच्याकडे केली होती. त्या वेळी श्री. भोसले यांनी या ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास चित्रीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे खोचरे यांनी सांगितले. चित्रीकरण केल्यामुळेच एका गटाने सभेच्या ठिकाणी मारामारी केली. ग्रामसभा वादळी ठरल्याचे समजताच घटनास्थळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय पडते, जिल्हा महिला प्रमुख जान्हवी सावंत यांनी भेट देऊन ग्रामसभेची योग्यती प्रक्रिया करण्याच्या सूचना ग्रामविस्तार अधिकारी श्री. मोरे यांना दिल्या. वातावरण तंग बनू नये यासाठी पोलिस कुमकही घटनास्थळी मागविण्यात आली; मात्र उपसरपंच यांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून सभा स्थगित करण्याचा शेरा नोंदवहीत नमूद केला. त्याला दुसऱ्या गटातील ग्रामस्थांनी विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत कोरम असताना ग्रामसभा झाली पाहिजे अशी मागणी केली. सकाळी आठ वाजल्यापासून ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सचिवांनी सभा घेतली पाहिजे, असे त्या गटाने सुचित करून श्री. मोरे यांनी याबाबत गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून प्रशासकीय माहिती घेतली. अखेर त्यांच्या मार्गदर्शनानुसार दुपारी तीन वाजता घटनास्थळी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. भोई, विस्तार अधिकारी आर. डी. जंगले यांनी भेट देऊन सभेचे कामकाज सुरू करण्याचे सांगितले. त्यानुसार तेथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वारंग यांच्या अध्यक्षतेखाली ३ वाजून १० मिनीटांनी ग्रामसभेला सुरवात झाली. सुरवातीला शंभरहून अधिक ग्रामस्थांच्या सह्या घेतल्यानंतरच सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. या वेळी अनुप्रिती खोचरे, माजी सभापती श्रीमती घावनळकर, श्री. मेस्त्री, धर्मा सावंत, श्री. घावनळकर, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

हुकूमशाही खपवून घेणार नाही
घावनळे गावात यापुढे कोणाची हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. ग्रामसभेत ग्रामस्थांच्या अधिकाराना महत्व आहे. यापुढे त्यांचे अधिकार कोणी घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. आमची ताकद काय आहे ती आता दिसून आली असा इशारा जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांनी दिला.

ग्रामसभेची योग्य प्रक्रिया करा
ग्रामसभेत ग्रामस्थांचे प्रश्‍न महत्वाचे असतात. स्थगित केलेली ग्रामसभा झाली पाहिजे. त्यानुसार प्रक्रिया करण्याचे आदेश आमदार वैभव नाईक यांनी दिले. यावेळी प्रभाकर वारंग यांनी गेली कित्येक वर्षे ग्रामपंचायतीने गावाला विकासापासून वंचित ठेवल्याचे सांगितले.

स्वतंत्र खुटवळवाडी ग्रामपंचायतीची मागणी
घावनळे गावात चार महसूल गावे येतात. यामध्ये खुटवळवाडीचा समावेश आहे. वाडीची लोकसंख्या ग्रामपंचायत स्वतंत्र होण्यास परिपूर्ण आहे. या गावाचा विकास होत नसल्याने आम्ही ग्रामसभेत खुटवळवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशी मागणी केल्याचे ग्रामसभा अध्यक्ष प्रभाकर वारंग यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com