कुंभारमळा शेतकऱ्यांना रोजगाराचा पर्याय

rajapur
rajapur

राजापूर - शहरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीचे मुबलक पाणी आणि कसदार जमिनीचा सदुपयोग करीत कोणत्याही विशेष मार्गदर्शनाविना शहरातील प्रसिद्ध कुंभारमळ्यात शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली आहे. ताजी भाजी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यातून रोजगाराचा एक आदर्शवत पर्याय निर्माण केला आहे. हंगामी भाजीविक्रीसह शेतीमधून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यातून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे.

सध्याच्या धावपळीत आरोग्यसंपदा सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. पालेभाज्यांतून मिळणाऱ्या कॅलरीज शरीराला अधिक पोषक ठरतात. त्यामुळे आजही आहारामध्ये पालेभाज्यांना महत्त्व आहे. अशा या पालेभाज्यांची मागणी अर्जुनेच्या काठावरील पाटीलमळ्यातील शेतकरी पूर्ण करीत आहेत. पावसाळ्यानंतर अर्जुना काठची शेती ओसाड असते; मात्र शहरातील कुंभारमळा त्याला अपवाद ठरला आहे. 

शेतीक्षेत्रातील तज्ज्ञांच्या विशेष मार्गदर्शनाअभावी केवळ अनुभवाच्या जोरावर गेली कित्येक वर्षे दिवटेवाडी, ओगलेवाडी आदी परिसरातील तांबे, रानडे, पवार, नाचणेकर, सोगम, ओगले आदी शेतकरी या मळ्यामध्ये भाजीपाला लागवड करतात. यामध्ये भेंडी, वांगी, कोथिंबीर, मुळा, पोकळा, बारीक मेथी, मिरची, कारली, वालीच्या शेंगा, पडवळ, दोडगा, गावठी काकडी आदींचा समावेश आहे. चांगल्या पालेभाज्यांच्या बियाण्यांची निवड करून नोव्हेंबर ते मे या दरम्यान भाजीपाल्याची लागवड केली जाते. विविध प्रकारची तयार झालेली भाजी स्थानिक बाजारपेठेसह नजीकच्या गावांमध्ये जाऊन शेतकरी तिची विक्री करतात. 

पालेभाज्यांच्या लागवडीमध्ये महिलांसोबत पुरुषांचाही सहभाग असला, तरी भाजी विक्रीचे काम बहुतांशी महिलाच करतात. तालुक्‍यातील बाजारपेठेत खरवते, गोवळ, हर्डी आदी गावांतील शेतकरी फळभाज्या, पालेभाज्या विक्रीसाठी आणतात. प्रत्येक गावातील भाजीपाल्याची एक वेगळी ओळख आहे. त्याप्रमाणे भाजीसाठी कुंभारमळ्यानेही स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या लागवडीला पारंपरिकतेसह व्यावसायिक जोड दिली आहे. भाजीपाला लागवडीतून स्वतःच्या कुटुंबासह इतरानाही रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहे. येथील शेतकऱ्यांनी केलेला प्रयत्न एक आदर्शवतच म्हणावा लागेल. 

प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख....
राजापूर पालिकेचे सेवानिवृत्त मुख्य लिपिक आणि माजी नगरसेवक चंद्रकांत सोगम आणि सेवानिवृत्त शिक्षक मधुकर पवार यांची कुंभारमळा आणि सोगममळ्यातील आपापल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करणारे, संकरित जातींचा उपयोग करून उत्पादन घेणारे प्रयोगशील शेतकरी विशेष ओळख आहे. भाजीपाला लागवडीतून त्यांनी इतरांनाही रोजगार मिळवून दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com