कुणकेश्‍वर यात्रेची समुद्रस्नानाने सांगता (व्हिडिओ)

कुणकेश्‍वर यात्रेची समुद्रस्नानाने सांगता (व्हिडिओ)

देवगड - असंख्य शिवभक्‍तांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेची पवित्र समजल्या जाणाऱ्या समुद्रस्नानाने आज सांगता झाली. जिल्हाभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या देवस्वाऱ्यांसह त्यांच्यासोबतच्या मंडळीनी तसेच भाविकांनी समुद्रस्नान केले. यावेळी समुद्रकिनारा गर्दीने फुलून गेला होता. समुद्रस्नानानंतर भाविकांची दर्शनासाठी रांग होती. तीन दिवस चाललेल्या यात्रेत मोठी उलाढाल झाली.

सोमवारी (ता. 4) महाशिवरात्रीला यात्रेचा प्रारंभ झाला. महाशिवरात्रीला सोमवार आल्याने रविवारी रात्रीपासूनच अनेकांची पावले कुणकेश्‍वरच्या दिशेने वळली होती. रविवारी रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कालच्या दुसऱ्या दिवशीही यात्रेत भाविकांची गर्दी कायम होती. काल सायंकाळपासून अमावस्या सुरू झाल्यामुळे यात्रेत समुद्रस्नानासाठी गर्दी वाढू लागली होती.

आज रात्रीपर्यंत अमावस्या असल्याने पहाटेपासूनच समुद्रस्नानासाठी किनाऱ्यावर गर्दी उसळली होती. विविध ठिकाणच्या दोन देवस्वाऱ्या कुणकेश्‍वर भेटीसाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत मोठा लवाजमा असल्यामुळे यात्रेत मोठी गर्दी झाली होती. देवस्वाऱ्यांसोबत आलेल्या मंडळींनीही समुद्रस्नान केले. लहान मुलांबरोबरच महिला व जेष्ठांनीही समुद्रस्नानाचा आनंद लुटला. समुद्रस्नान करताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात होती. समुद्राच्या पाण्यात खोलवर न जाण्याचा संदेश देण्यात येत होता. लहानमुलांना सांभाळण्याची सुचनाही केली जात होती. समुद्रस्नान करून देवस्वाऱ्या माघारी परतल्या. 

यात्रा कालावधीत विविध राजकीय नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांनी कुणकेश्‍वरचे दर्शन घेतले. विविध ठिकाणच्या भजनी मंडळींची मंदिरात भजने झाली. आज सकाळी समुद्रस्नान करून दर्शन घेण्यावर अनेकांचा भर होता. दुपारपर्यंत रस्त्यावर वर्दळ दिसत होती. एसटी गाड्यांची ये-जा सुरू होती. यात्रेत खाजा, विविध खाद्यपदार्थ, शेतीजन्य विविध अवजारे, कलिंगड, कपडे, भांडी, शोभिवंत वस्तू, प्लॉस्टीक साहित्य यांची मोठी उलाढाल झाली. हॉटेल व्यावसायिकांनाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. महसूल व पंचायत समितीचा कक्ष कार्यरत होता. यात्रा मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ दिसत होती. खासगी, दुचाकी वाहनांची संख्याही मोठी होती. रात्री मंदिर परिसर, समुद्रकिनारा तसेच यात्रेकडचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.

समुद्रकिनारच्या भेळ, आईस्क्रिम तसेच विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी दिसत होती. समुद्रकिनारी छायाचित्रे काढण्यासाठीही धडपड होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com