सिंधुदुर्गातील ओटवणे वनक्षेत्रात डोंगर खचला

सिंधुदुर्गातील ओटवणे वनक्षेत्रात डोंगर खचला

ओटवणे - सह्याद्रीच्या रांगामधील डोंगर खचण्याचे सत्र सुरूच आहे. ओटवणे येथे वनविभागाच्या क्षेत्रात भूस्खलन झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही खचलेली माती आणि चिखल खाली शेतजमिनीत पसरल्याने स्थानिक हैराण झाले आहेत. 

अतिवृष्टीचा तडाखा "सह्याद्री'ला बसला. अनेक ठिकाणी भेगा पडून डोंगर कमकुवत झाले. झोळंबे, असनिये, कोलझर आदी भागात डोंगर खचल्याचे प्रकार उघड झाले. याच रांगामध्ये असलेल्या ओटवणे येथेही असाच प्रकार घडल्याचे आता पुढे आले आहे. यामुळे आधीच अतिवृष्टीने ओटवणे दशक्रोशीत त्रासलेल्या जनतेच्या समस्येत वाढ झाली आहे. ओटवणे मांडवफातरवाडी ते मांजरदारा कारिवडे सीमेलगत असलेल्या वनखात्याच्या एक एकर क्षेत्रात भूस्खलन होऊन भला मोठा डोंगर कोसळल्याने मातीचा भराव स्थानिक शेतकऱ्यांच्या शेत जमिनीपर्यंत आला आहे. याबाबत वनखाते मात्र अनभिज्ञ आहे. मातीचा भराव ओटवणे-सावंतवाडी मार्गावरही वाहून आल्याने रस्त्यावर दलदल निर्माण झाली आहे. 

ओटवणे मांडवफातरवाडी मांजरदाराच्या उत्तेरेकडील कारिवडे सीमेलगत वनखात्याचे क्षेत्र आहे. यामध्ये अतिवृष्टीत डोंगर कोसळल्याने कित्येक मोठ-मोठी झाडे उन्मळून उद्‌ध्वस्त झाली. शेतात आणि ओटवणे मुख्य मार्गावर डोंगराची माती वाहत येऊन दलदल निर्माण झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी त्या दिशेने पाहणी केली असता वनखात्याच्या क्षेत्रामध्ये डोंगर ढासळण्याचे लक्षात आले. ही डोंगराची माती, चिखल भात शेतीत तसेच रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांसह प्रवाशांनासुद्धा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाण्याच्या प्रवाहाने वाहून येणारी माती शेतकऱ्यांच्या शेती पर्यंत पोहचू लागल्याने भात शेतीची नुकसानी होत आहे. 

आणखी काही घटनांची शक्‍यता 
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसून सिंधुदुर्गाबरोबर रत्नागिरीतही डोंगर खचण्याचे प्रकार घडले. बहुसंख्य ठिकाणी वृक्षतोड किंवा जमिनीचे उत्खनन झाल्याचे चित्र आहे. आणखी काही निर्मनुष्य भागातही असे प्रकार घडल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा घटना शोधून सर्व ठिकाणचा परिपुर्ण अभ्यास करावा आणि त्यावर त्वरित उपाय योजावेत, अशी मागणी सह्याद्रीच्या रांगामधील बाधित गावांमधून होत आहे. 

खैराच्या चोरीचा डोंगराला फटका 
एवढा मोठा भूस्खलनाचा प्रकार घडून सुद्धा वनखात्याला याची काहीच माहिती नाही. तर हा प्रकार घडण्यास वनखाते जबाबदार असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या जंगलात खैर झाडांची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने त्याच्या मुळापासून केलेल्या खोदाईमुळे हा प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येते; मात्र कोट्यवधींचे वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलन व संरक्षण करण्यासाठी धडे शिकविणाऱ्या वनखात्याच्या दुर्लक्षामुळेच डोंगराचे भूस्खलन होऊन झाडांची मोठी हानी झाली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com