पॉइंटमनच्यासमोर आला त्याच्या पत्नीचाच मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

लांजा - रेल्वे रूळ ओलांडताना राजधानी एक्‍स्प्रेसची धडक बसल्याने महिला जागीच ठार झाली. या अपघाताला अत्यंत दुर्देवी किनारही आहे. अपघातात मृत्युमुखी कोण पडले व काय झाले आहे हे पाहण्यासाठी पॉइंटमनला पाठविले. तो मृतदेह पॉइंटमनच्या पत्नीचाच असल्याचे आढळून आले.

लांजा - रेल्वे रूळ ओलांडताना राजधानी एक्‍स्प्रेसची धडक बसल्याने महिला जागीच ठार झाली. या अपघाताला अत्यंत दुर्देवी किनारही आहे. अपघातात मृत्युमुखी कोण पडले व काय झाले आहे हे पाहण्यासाठी पॉइंटमनला पाठविले. तो मृतदेह पॉइंटमनच्या पत्नीचाच असल्याचे आढळून आले.

ही दुर्घटना आज सकाळी दहाच्या सुमारास वेरवली-मांडवकरवाडी बोगद्यानजीक घडली. सुवर्णा अंकुश बेंडल (वय 42, मांडवकरवाडी, वेरवली) असे मृत महिलेचे नाव आहे. सुवर्णा बेंडल या सकाळी 10 वाजण्याच्या गुरे चरण्यास घेऊन गेल्या होत्या. मांडवकरवाडी येथील बोगद्यानजीक रेल्वे रुळ ओलांडत असताना राजधानी एक्‍स्प्रेसने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत सुवर्णा बेंडल यांच्या शरीराचे तुकडे झाले. याची माहिती मोटारमनने विलवडे स्टेशनमास्तरांना दिली. त्यांनी ही माहिती आडवली स्टेशनमास्तर संतोष करमरकर यांना दिली.

माहिती मिळाल्यानंतर करमरकर यांनी पॉईंटमन अंकुश बेंडल यांना पाहणी करण्यास सांगितले. अंकुश बेंडल यांनी बोगद्यानजीक जाऊन पाहणी केली असता त्यांना आपल्याच पत्नीचा मृतदेह पाहावा लागला. सुवर्णा बेंडल यांना तीन मुली व एक मुलगा आहे. याबाबतची माहिती मिळताच लांजा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पंडित पाटील, हेडकॉन्स्टेबल सीताराम पंदेरे, शशिकांत सावंत दाखल झाले. भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. या रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सुवर्णा बेंडल यांचे पती अंकुश हे रेल्वे कर्मचारी असून ते आडवली रेल्वे स्टेशन परिसरामध्येच पॉइंटमन म्हणून कार्यरत आहेत.

बेंडल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
या दुर्दैवी घटनेत बळी गेलेल्या सुवर्णा बेंडल यांच्या मोठ्या मुलीचे लग्न ठरले असून ते एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यामुळे घरात आतापासूनच लग्नाची तयारी सुरू होती. याच अवधीत सुवर्णा यांच्यावर काळाने घाला घातल्याने बेंडल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: lanja konkna news women death in express dash