पूर नियंत्रणासाठी धरणांवर आता अत्याधुनिक यंत्रणा

पूर नियंत्रणासाठी धरणांवर आता अत्याधुनिक यंत्रणा

रत्नागिरी - अतिवृष्टीमुळे धरणातील पाणी अचानक सोडल्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीचा तडाखा नदीकिनाऱ्याजवळील गावांना बसतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. कोकणातील 63 धरणांसह राज्यात ही प्रणाली बसविण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नातूवाडी, पिंपळवाडी, गडनदीसारख्या गेटद्वारे पाणी सोडणाऱ्या मोठ्या धरणांसह अन्य प्रकल्पांचा त्यात समावेश होणार आहे. 

धरणांवर स्वयंचलित पर्जन्यमापक, हवामान केंद्र, नदी प्रवाहमापक आणि बाष्पीभवन अशी यंत्रणा बसवली जाणार असून त्याद्वारे होणारी नोंद 24 तास केव्हाही संगणकावर पाहता येणार आहे. रिमोट सेन्सरद्वारे ही माहिती संकलित केली जाते. अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून प्रत्येक धरणप्रमुखाला अद्ययावत माहिती मानवी हस्तक्षेपाशिवाय जलद गतीने मिळेल. त्यामुळे धरणात येणाऱ्या आणि नदीतून वाहणाऱ्या पाण्याविषयी माहिती मिळेल. त्याचबरोबर संभाव्य पूरस्थितीचा संगणकीय नकाशा उपलब्ध होईल. यामुळे जलनियंत्रण सुलभ होईल. 

यंदा पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला महापुराचा तडाखा बसला. पावसाळ्यात धरणात करावा लागणारा जलसंचय किंवा विसर्ग हे निर्णय चुकीचे ठरले तर धरणाखालील भाग पाण्यात जाऊ शकतो. विसर्ग न केल्यास धरण धोक्‍यात येऊ शकते, चिपळूण-तिवरेतील प्रकारानंतर हे लक्षात आले. जलसाठा किंवा विसर्गासाठी दरवाजे कधी उघडायचे, याचे वेळापत्रक उपलब्ध माहितीद्वारे निश्‍चित केले जाते. ही माहिती पारंपरिक आधारसामग्री केंद्रातून कर्मचारी संकलित करतो. ते संकलन सकाळी आठ वाजता होते. कोकणासारख्या भागात अतिवृष्टीमध्ये प्रत्यक्ष धरणावर जाऊन हे काम पाहावे लागते. रात्री अशी परिस्थिती उद्‌भवल्यास प्रत्येकवेळी असे काम करणे शक्‍य होतेच, असे नाही. अशावेळी अत्याधुनिक यंत्रणेमुळे कार्यालयात बसून धरण क्षेत्रातील परिस्थितीची माहिती घेणे शक्‍य होणार आहे. 

कृष्णा-भीमा खोऱ्यात यंदा अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला गेला. हीच यंत्रणा राज्यातील सर्व खोऱ्यात बसविण्याबाबतची व्यवस्था नाशिकच्या राष्ट्रीय जलविज्ञान केंद्रामार्फत राबविली जात आहे. राज्यात पावणेसहाशे ठिकाणांची निवड केली असून त्यात कोकणातील 63 धरणे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या धरणांवर ही यंत्रणा बसविली जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. त्यातही गेटद्वारे पाण्याचा विसर्ग करणाऱ्या धरणांना प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील छोटी धरणे पावसाळ्यात भरून वाहतात. नव्या यंत्रणेमुळे चोविस तास लक्ष ठेवणे पाटबंधारे विभागाला सोपे जाणार आहे. धरणक्षेत्रातील भूस्खलनावरही नियंत्रणासाठी ही यंत्रणा उपयुक्‍त ठरु शकते, असे पाटबंधारे विभागाचे अधिकारी अजय दाभाडे यांनी सांगितले. 

आधुनिक उपकरणांमुळे स्वयंचलित पद्धतीने तत्काळ माहिती उपलब्ध होणार असून पूर नियंत्रित करण्यासाठी मदत शक्‍य आहे. राज्यातील बहूतांश खोऱ्यात ही प्रणाली राबविली जाणार आहे. त्यात कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मोठ्या धरणांचा समावेश आहे. ही यंत्रणा नाशिकमधील राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामार्फत राबविण्यात येत आहे. 
- राजेंद्र पवार,
सचिव, जलसंपदा विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com