बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी ; शक्कल लढविल्यामुळे वाचले प्राण

सुधीर विश्वासराव
Saturday, 5 September 2020

मेर्वीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर... 

पावस (रत्नागिरी) : तालुक्यातील पावस मेर्वी येथे जांभुळभाटलेत बिबट्याने एकावर हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. गुरे चरवायला गेलेल्या   ग्रामस्थावर बिबट्याने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले.जनार्धन काशिनाथ चंदूरकर (वय -55रा. मेर्वी जांभूळआडी) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. पावस परिसरात यापूर्वी देखील बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी सकाळी पुन्हा बिबट्याने शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. 

सकाळी ते गावाजवळील जंगलात गुरे चरण्यासाठी गेले होते. गुरे चरवून परत येत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यातून सुटण्यासाठी त्यांनी धडपड केली. यामध्ये त्यांच्या मानेवर बिबट्याच्या नखांचे  तीव्र व्रण उठले आहेत. 

हेही वाचा- स्मशानभूमीत स्वॅब घेतल्याचा आक्षेप, कुठले हे प्रकरण? वाचा...

याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार,  

जनार्धन चंदूरकर हे जांभुळ भाटले येथे गुरे चारण्यासाठी गेले. गुरे सोडून ते घरी परतत होते. वाडीत येण्यासाठी आंबा बागेतून पायवाट आहे. त्यातून चालत येत असताना बिबट्याची पिल्ले दिसली.  ती पाहण्यासाठी ते पुढे सरसावले.  त्याचवेळी तिथे असलेल्या मादी बिबट्याने चंदूरकर यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात ते बिथरून गेले. काही क्षण ते निपचित पडून राहिले. चंदुरकरे हालचाल करत नव्हते.  त्यामुळे बिबट्या पिल्लांच्या दिशेने गेला. तीच संधी वाचंण्यासाठी चंदुरकर यांना मिळाली आणि ते तिथून बागे जवळ काही अंतरावर असलेल्या शेत घरात पळाले.  शेत घराच्या टेरेसवर जाऊन त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने ग्रामस्थ घटना स्थळी दाखल झाले.

हेही वाचा-कोणतेही लक्षणे नसलेले 85 टक्के कोरोना रुग्णच संसर्ग वाढीसाठी का ठरतात घातक

हा प्रकार समजल्या नंतर मेर्वी सरपंच शशी म्हादये,  ग्रामस्थ,  वन विभागाचे अधिकारी प्रियांका लगाटे घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या चंदूरकर यांच्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला झालेल्या ठिकाणी रक्त पडलेले होते.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard attacks one in Jambhulpada at Pawas Mervi