बिबट्या अडकला.. बघ्यांची गर्दी झाली अन् अचानक तो सुटला..!

प्रभाकर धुरी
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

दोडामार्ग - गिरोडे येथे फासकीत अडकलेला बिबट्या आढळला. ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाचे कर्मचारी तेथे जाळी आणि पिंजरा घेवून पोचण्याआधीच त्याने फासकीतून आपली सुटका करुन घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

दोडामार्ग - गिरोडे येथे फासकीत अडकलेला बिबट्या आढळला. ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाचे कर्मचारी तेथे जाळी आणि पिंजरा घेवून पोचण्याआधीच त्याने फासकीतून आपली सुटका करुन घेतली. बिबट्या निसटलेला पाहतचा बघ्यांची पाचावर धारण बसली. पण त्यांने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. जीवाच्या आकांताने सुरू असलेली त्याची सुटण्यासाठीची झुंज अखेर कित्येक तासानंतर यशस्वी झाली आणि गावकऱ्यांसह वन कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. 

गिरोडे गावालगत देवसू नावाचे ठिकाण आहे. तेथे काजूबागा आहेत. रस्त्यापासून वीस पंचवीस फुटावर असलेल्या काजू बागेच्या बांधावर तेथून जाणाऱ्या गावकऱ्यांना तो दिसला. त्याने रात्रभर सुटका करुन घेण्यासाठी खूप धडपड केल्याचे तेथील खुणांवरुन दिसत होते. बिबट्या फासकीत अडकल्याचे समजताच गावकरी आणि आजूबाजूच्या गावातील लोकांनी गर्दी केली. अनेकांनी फोटो व्हिडिआे काढले. काहीजण त्याला बघण्यासाठी झाडावरही चढले. गर्दी आणि गलका वाढू लागला तसा तो अस्वस्थ आणि आक्रमक झाला. मोठमोठ्याने डरकाळी फोडू लागला. सुटण्यासाठी फासकीची केबल आणि लाकूड चावू लागला. 

पोलिस पाटील श्रीकांत राणे, मणेरी वनपाल म. ल. नाईक, वनमजूर शिवाजी रेडकर, रमेश आईर आलेत. वनअधिकाऱ्यांना कळवून जाळी आणि पिंजरा मागवण्यात आला. वेळ जात होता तशी गर्दी आणि गलका वाढला. त्यामुळे तो खूपच आक्रमक झाला. खरेतर तो अन्यत्र कुठेतरी लावलेल्या फासकीत अडकला असण्याची शक्‍यता आहे. कारण त्याने फासकीसकट आणलेला हिरवा वासा तो पळताना बांधावरच्या एका झाडाच्या बुंध्यात अडकला होता. त्यामुळे तोही अडकला. त्याने रागाने तो वासाही सोलल्याचे दिसत होते. त्याच्यापासून पाच सहा फुटावर असलेल्या झाडावरही त्याच्या नखाच्या खुणा अगदी पंधरा वीस फूट उंचीपर्यंत दिसत होत्या. त्यामुळे वासा आणि फासकी यातून सुटण्यासाठी तो झाडावर चढला असण्याची शक्‍यता आहे.

सुटण्यासाठी त्याने खूप धडपड केली आणि अखेरीस तो त्यात यशस्वी झाला. सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान बघ्यांचा जमाव आला. माणसांची गर्दी बघून त्याने डरकाळी फोडली. त्याबरोबर वाट मिळेल तिकडे सगळे पळाले आणि त्याच दोन तीन मिनिटांत त्याने जीवाच्या आकांताने केबलला हिसका दिला आणि फासकी तोडून रस्त्यावरील गर्दीतून वाट काढत उगवतीच्या डोंगरातील जंगलात त्याने धूम ठोकली.

तो फासकीतून सुटल्याचे कळताच सगळ्यांची पाचावर धारण बसली, बिबट्याच्या भीतीने पळापळ झाली; मात्र तो दिसेनासा होताच; मात्र सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

शिकार आणि घुसखोरीही 
गिरोडेत याआधी बिबट्याने अनेक वन्यप्राण्यांची शिकार केली आहे. गुरांच्या गोठ्यातही धुडगूस घातला आहे. अनेकांना त्याचे भरदिवसा दर्शनही घडले होते. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीसहून अधिक सांबरांची शिकार केल्याचे जंगलात आढळलेल्या अवशेषावरुन स्पष्ट झाले आहे. गुरांच्या गोठ्यात घुसून त्याने गाई वासरांवर हल्ला केल्याचेही निखिल गवस, उपसरपंच नंदू गवस आदींनी सांगितले. 

Web Title: Leopard seen in Girode in Sindhudurg