esakal | डोंगराच्या एका उंच खडकावर बसतोय बिबट्या, गावात होऊ लागली चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

leopard seen in tondavali sindhudurg district people see every time in villege

तोंडवळी येथे गेल्या काही महिन्यांपासून डोंगराच्या एका उंच खडकावर येऊन बिबट्या विसावत आहे. या खडकावर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बिबट्या होता.

डोंगराच्या एका उंच खडकावर बसतोय बिबट्या, गावात होऊ लागली चर्चा

sakal_logo
By
महेश बापर्डेकर

आचरा : तोंडवळीत दिवसाढवळ्या एका विशिष्ट खडकावर येऊन बसणारा बिबट्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरलाय. विशेष म्हणजे या गावचे ग्रामदैवत वाघेश्‍वर आहे. या बिबट्याचा मुक्‍त संचार अगदी कॅमेऱ्यातही चित्रबद्ध झाला. तोंडवळी येथे गेल्या काही महिन्यांपासून डोंगराच्या एका उंच खडकावर येऊन बिबट्या विसावत आहे. या खडकावर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बिबट्या होता. हे दृश्‍य तोंडावळी येथील सर्वेश पेडणेकर याने चित्रित केले आहे.

हेही वाचा - नोकरी हवीय ? वेबसाइटवर करा आधारकार्ड लिंक  

अधूनमधून असे दर्शन देणाऱ्या या बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थ वाट पाहत असतात. ग्रामदैवतच वाघेश्‍वर असलेल्या तोंडवळी गावात संध्याकाळी होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनाला वेगळंच महत्त्व आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तोंडवळी (मालवण) माळरानावर तसा सर्रास पशुपक्षी यांचा नेहमीच मुक्त संचार पहावयास मिळतो. येथील वाघेश्‍वर मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होऊ लागले आहे.

सुरूवातीला अधूनमधून क्वचितच येणारा बिबट्या गेल्या महिन्यात दिवसांपासून एक दोनदा मंदिराकडून जाणाऱ्या रस्त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या कपारीवर वारंवार होऊ लागले. त्यामुळे रस्त्यावर संध्याकाळी पाचपासूनच बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. या भागात बिबट्या असूनही माळरानावर मोकळ्या सोडलेल्या गुरांना किंवा पाळीव जनावरांनाही बिबट्याने कोणतीही इजा पोहोचवली नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. दररोज सायंकाळी किंवा दिवसाआड बिबट्याचे होणारे दर्शन हा तोंडवळी ग्रामस्थांचा चर्चेचा विषय ठरला आहे.

ग्रामदैवत वाघेश्‍वर मंदिरामागील जंगलात होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनाला वेगळेच महत्त्व आल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. या अगोदरही या जंगलात आम्हाला बिबट्या दिसून येत असे. या मागचे कारण ग्रामस्थ धार्मिकतेला जोडून देत असले तरी येथे संध्याकाळी आळोखे पिळोखे देत खालच्या बाजूला झालेल्या गर्दीची तमा न बाळगता डोंगराच्या कड्यावर बिनधास्त येणारी बिबट्याची स्वारी मात्र या भागात चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा -  गणपतीपुळेतील स्थिती ; किनाऱ्यावरूनच श्रींच्या कळस दर्शनावरच भक्‍तांचे समाधान

"मांजरकुळातील प्राण्यांना टेहळणीसाठी अशी एखादी उबदार, मोकळी जागा लागते. ही त्यांची नैसर्गिक सवय असते. मळगाव जंगलात खडकावरही बिबट्याचे अनेकदा दर्शन झाले आहे. खडक किंवा उंच जागा नसते तिथे हे प्राणी सुटसुटीत आडव्या फांदीवर बसतात. कार्यक्षेत्राची टेहळणी, ऊब, ऊन याबरोबरच भक्ष्याचा शोध घेण्यासाठी ते असे करतात. तोंडवळी येथील बिबट्याही याच कारणासाठी त्या खडकावर वारंवार टेहळणीसाठी येत असावा."

- सुभाष पुराणिक, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव पांढरकवडा

संपादन - स्नेहल कदम