कोकणात आधि कोरोना नंतर सारी आणि आता लेप्टोचा शिरकाव ; ओटवणेत आढळला लेप्टोचा रुग्ण...

महेश चव्हाण
Saturday, 25 July 2020

जिल्ह्यात लेप्टोचा रुग्ण सापडला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

ओटवणे (सिंधुदुर्ग) :  कोरोनाचा कहर सुरू असतानाच जिल्ह्यात लेप्टोचा रुग्ण सापडला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. संबंधित रुग्ण ओटवणे-भटवाडी येथील आहे.
गेली काही वर्षे जिल्ह्यात लेप्टोचा कहर सुरू होता. खरिपाच्या हंगामात याचा प्रादुर्भाव व्हायचा. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच लेप्टोचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

गेली काही दिवस या व्यक्तीला वारंवार ताप येत होता. खासगी डॉक्‍टरकडे तपासणी केल्यानंतर काही दिवस त्यांना बरे वाटू लागले; पण पुन्हा ताप येऊ लागल्याने त्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी या व्यक्तीला लेप्टो झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.

हेही वाचा- राजकीय कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक :  शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या संपर्कातील यादी वाढणार...सविस्तर वाचा.. -

दरम्यान, ही व्यक्ती उपचाराला साथ देत असून प्लेटलेट वाढत असल्याचे आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका संगीता नाईक यांनी सांगितले. सतत शेती चिखलात वावरणाऱ्या एकाद्‌दुसऱ्या व्यक्तीला हा आजार उद्‌भवतो. म्हणून या लेप्टो तापाबाबत आरोग्य यंत्रणा जागृत होती. लेप्टो होऊ नये, म्हणून ओटवणे गावातील जोखीमग्रस्त भागासहित प्रतिबंधात्मक गोळ्यांचे १५ दिवसांपूर्वी वाटप करण्यात आले होते. मात्र, संबंधित रुग्णाने प्रतिबंधात्मक गोळ्यांचे डोस पूर्ण न केल्यामुळे हा आजार झाला असावा, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा- आरोग्यचा कारभार : स्वॅब घेतलेल्या ट्यूब फुटल्या , आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या त्या ४० जणांची केली  होती तपासणी.... -

 

माहिती देण्याचे आवाहन 
याबाबत पुन्हा आरोग्य यंत्रणेकडून सर्व्हे करून खबरदारीसाठी पावले उचलली जातील. ज्या व्यक्तींना वारंवार ताप येत आहे, त्यांनी खासगी डॉक्‍टर करून गप्प न बसता ओटवणे आरोग्य उपकेंद्राला माहिती द्यावी, असे आवाहन ओटवणे सरपंच उत्कर्षा उमेश गावकर यांनी केले आहे.

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lepto patient found in the sindhudurg district Lepto virus became in sindhudurg