पशुधन पर्यवेक्षकाची देवरूखात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

साडवली - पशुधन पर्यवेक्षक म्हणून सेवेत असणारे डॉ. अनिल प्रल्हाद शिंदे (वय २८) यांनी शनिवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. देवरूखजवळील घोडवली येथे ते कार्यरत होते. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

साडवली - पशुधन पर्यवेक्षक म्हणून सेवेत असणारे डॉ. अनिल प्रल्हाद शिंदे (वय २८) यांनी शनिवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. देवरूखजवळील घोडवली येथे ते कार्यरत होते. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

डॉ. शिंदे हे देवरूख भुवड कॉलनी येथील महाराणा प्रताप हवेली येथे पत्नी व बहिणीसह खोली भाड्याने घेऊन राहात होते. शुक्रवारी (ता. १०) रात्री त्यांच्या घरी पाहुणे मंडळी आली होती. हे सर्व पाहुणे शनिवारी सकाळी मार्लेश्वरला देवदर्शनासाठी गेले. तेव्हा ‘मला ऑफिसचे काम आहे, मी येत नाही,’ असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. ही मंडळी मार्लेश्वरहून परत आल्यावर त्यांना खोलीचे दार बंद दिसले.

हवेली मालक भगवत चुंडावत व शिंदे यांचे मेव्हणे यांनी दार तोडले असता किचनमध्ये दोरीच्या साह्याने डॉ. शिंदे हे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. लगेच पोलिसांना खबर देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांसमक्ष डॉ. संदीप माने यांनी शिंदे हे मृत झाल्याचे जाहीर केले. पोलिसांनी ही घटना सकाळी दहा ते दुपारी एक या काळात घडल्याचे नमूद केले. देवरूख ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

डॉ. अनिल शिंदे हे मूळचे बीड-मणेरीवाडी येथील असल्याने शिंदे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेने बीड येथे नेण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पी. डी. कदम करत आहेत.

Web Title: Livestock Supervisor Anil Shinde Suicide