कोकणात सहा जणींनी संकटात शोधली संधी ; फुलवली झेंडूची शेती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

स्थानिक पातळीवर ही फुले शंभर रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहेत.

संगमेश्वर : येथील बचत गटातील सहा महिलांनी आपल्या परसात 600 झेंडू लागवड केली. या रोपांना फुले लागण्यास सुरवात झाली आहे. स्थानिक पातळीवर ही फुले शंभर रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहेत. झेंडू लागवडीतून महिलांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत मिळाला असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. 

हेही वाचा - कोकणात महिलांना दिली उमेद ; समूह शेतीतून मिळवले दीड लाखांचे उत्पन्न

स्वयंसहाय्यता समूहांना रोजगार मिळवून देण्यासाठी ग्राम संघाच्या अध्यक्षा शलाका सुर्वे यांनी तालुका उमेद अभियान अधिकारी यांच्याकडे मेमध्ये गोंडा रोपांची मागणी केली. जूनमध्ये रोपांची लागवड केली. एक रोप वाहतूक खर्चासह तीन रुपयास पडले. त्याची लागवड आणि मशागत खर्च प्रती रोप तीन रुपये झाला आहे. या महिलांना एक रोपांसाठी सहा रुपये खर्च आला. आता ही फुलशेती बहारास आली आहे. 

अनिता देसाई, अनघा सुर्वे, विनिशा सुर्वे, संजीवनी शितप, अरुणा सुर्वे या शेतकरी महिलांनी गोंडा लागवड केली. यंदा अधिक महिना आल्याने गणेशोत्सव पंधरा दिवस अगोदर आला. त्या दरम्यान फुले तयार झाली नाहीत. गणेशोत्सवात फुलांचा दर 180 ते 200 रुपये किलो असा होता. त्यामुळे महिलांना हा हंगाम मिळाला नाही. आता फुले तयार होऊ लागली आहेत. बाजारात फुलांना मागणी कमी आहे. 

हेही वाचा -  कोकणात सुपारीला लागतीये बुरशी ; उत्पन्नात होतीये घट 

दसराही एक महिना लांबल्याने फुलांना चढा भाव मिळण्याची शक्‍यता कमी आहे. परिसरातील बाजारपेठा बंद असूनही महिलांनी नाउमेद न होता, स्थानिक वाडीवाडीत फुले विक्री करून संकटात संधी शोधली. दसरा सणासाठी गोंडा व हळददेखील अनेक गटांनी, व्यक्तिगत महिलांनी लागवड केली आहे. 

"बाजारातील फुलवाल्यांबरोबर चर्चा केली असता, प्रति किलो 40 रुपये खरेदी दर आहे. यामध्ये तोटा होण्याची शक्‍यता आहे. किरकोळ फुले घेऊन तालुका ठिकाणी जाणे परवडत नाही. तालुका पातळीवर ग्रामसंघाचे फेडरेशन होऊन एकत्रित खरेदी झाली तर नफा मिळेल."

-शलाका सुर्वे, अध्यक्षा, ग्राम संघ कुंभारखाणी बुद्रुक

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown period 6 women self help group planted 600 marigolds in their backyards in konkan