esakal | पत्रांच्या अवलियाने लिहली तब्बल साडेसातशे पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown period pavasakar write a letter to 750 people various field through out india

लॉकडाउनमधील मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत त्यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील ७५० पेक्षा जास्त व्यक्तींना पत्रे पाठविली आहेत.

पत्रांच्या अवलियाने लिहली तब्बल साडेसातशे पत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तळेरे (सिंधुदुर्ग) : येथील संदेश पत्र, हस्ताक्षर संग्राहक निकेत पावसकर यांनी लॉकडाउन काळात देशभरातील विविध क्षेत्रातील एकूण ७५० व्यक्तींना पत्राद्वारे संपर्क साधला. या काळात अनेकांची संदेश पत्रे आली असून हा पत्र प्रपंच अव्याहतपणे सुरुच आहे. यातील सर्वच पत्रे प्रिय आहेत; मात्र डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्राने उत्साह अजून वाढल्याचे पावसकर यांनी सांगितले.

१४ वर्षांपासून विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी पत्राद्वारे संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरातील संदेश पत्राचे संग्रह करणारे पावसकर यांच्या संग्रही १२०० पेक्षा जास्त व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे आहेत. लॉकडाउनमधील मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत त्यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील ७५० पेक्षा जास्त व्यक्तींना पत्रे पाठविली आहेत. त्यातील काहींची संदेश पत्रे आली असून अजून अनेकांची उत्तरे प्रतिक्षेत आहेत.

हेही वाचा - मच्छीमारांनो समुद्रात जाताय ? मग थोडं जपुनच, तुमच्यासाठी महत्वाची सूचना

उत्साह वाढविणारे पत्र 

तळेरे येथे या संग्रहाचे सुंदर अक्षरघर असून त्या अक्षरघराला अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे. चार वर्षांपासून विख्यात शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना पाठविलेल्या पत्राला उत्तर हे हमखास येतेच; मात्र अलिकडेच डॉ. नारळीकर यांनीही या अक्षरघराला भेट देणार असल्याचे पत्राने कळविले आहे. डॉ. नारळीकर यांच्या त्या पत्रामुळे अजुनच उत्साह वाढल्याचे पावसकर यांनी सांगितले.

या संग्रहाचे निमित्त ठरलेले मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे पहिले पत्र साध्या पोस्टकार्डवर आले. पोस्टकार्ड जपून ठेवणे सोपे असल्याने संदेश पत्र पोस्टकार्डवरच घेतली जात असल्याचे पावसकर यांनी सांगितले. या संग्रहामुळे अनेक क्षेत्रातील व्यक्तींशी सबंध अधिक दृढ झाले आहेत. १४ वर्षांत अंदाजे पाच हजार व्यक्तींना १० हजारपेक्षा जास्तवेळा पत्रव्यवहार केल्याचे पावसकर यांनी सांगितले.  

हेही वाचा -  एसटीला मिळणार ऊर्जितावस्था ; आता राज्यभरात उभारणार पेट्रोलपंप, कोकणचाही समावेश 

असंख्य संदेश पत्रे 

लॉकडाउन काळात साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांची असंख्य संदेश पत्रे आलीत. त्यामध्ये डॉ. गणेश देवी, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अविनाश सांगोलेकर, माधुरी शानभाग, आशा बगे, रामदास पाध्ये, अर्चना पाध्ये, सत्यजित पाध्ये, जोसेफ तुस्कानो, हेमंत देसाई, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, ए. के. शेख, सुहास बारटक्के आदींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे पावसकर यांच्या संग्रहात दाखल झाली. परदेशात विविध क्षेत्रातील नामवंत ५० व्यक्तींची पत्रे तयार आहेत. दळणवळण सुरू होताच तिही पत्रे रवाना होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

संपादन - स्नेहल कदम