Lok Sabha Election 2024 : राज्यात १७० आमदार हेच उद्दिष्‍ट; बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे; पंतप्रधानांच्या महायज्ञात सहभागी व्हा
Chandrasekhar
Bawankule
Chandrasekhar Bawankule esakal

कणकवली : सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका समोर ठेवून भाजपचे महाराष्ट्र विधानसभेत १७० आमदार आणि केंद्रात ४०० खासदार निवडून आणायचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रत्‍येक कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. कलमठ महाजनीनगर येथील वृंदावन सभागृहात भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला. यात श्री. बावनकुळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्र वाघ, माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली, जिल्‍हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्‍हा सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

भारत हा जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवताना आणि भारताला गतवैभव मिळवून देण्याचा, जगाला मानव संसाधने पुरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ ते २०३५ या काळासाठी महायज्ञ आयोजित केला आहे. या महायज्ञामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही दररोज दोन तास देऊन किमान ८ घरांमध्ये जावे. या तासांत केंद्राच्या योजनांचे दोन लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदीजी पत्र, १८-२५ वयोगटातील युवा वॉरियर्सची निवड, नवमतदारांची नोंदणी, फ्रेंड्स ऑफ बीजेपी यांची निवड करावी, असेही आवाहन श्री. बावनकुळे यांनी केले.

...तर भाजपचा विजय निश्चित
श्री. बावनकुळे म्‍हणाले, ‘‘भाजपने उद्दिष्‍ट ठेवलेल्‍या ४०० लोकसभा मतदारसंघात रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकावा यासाठी प्रत्‍येक कार्यकर्त्याने सज्‍ज व्हावे. कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम केले तर आपला पराभव कुणीच करू शकत नाही. त्‍यामुळे वर्षभरात ठरवलेल्या सिंधुदुर्गातील ५०० पदाधिकाऱ्यांनी २८४० घरांमध्ये संपर्क साधला तर १४ लाख कुटुंबात पोहोचाल. यातून लोकसभा, विधानसभा, जिल्‍हा परिषद ते ग्रामपंचायतीपर्यंत भाजपचा विजय निश्‍चित असेल.

उद्धव ठाकरे निष्‍क्रिय मुख्यमंत्री
मागील अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द निष्क्रिय राहिली. त्‍यांनी भाजपला फसवलं. मतदारांशी बेईमानी करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार तयार केले. विकासाचे एकही काम झाले नाही. त्‍यामुळे आता मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस दररोज अठरा तास काम करून मागील अडीच वर्षांच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढत आहेत, असे श्री. बावनकुळे म्‍हणाले.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची कणकवलीत बुलेट सवारी

कणकवली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कणकवली दौऱ्याचा प्रारंभ दुचाकी फेरीने झाला. यात श्री. बावनकुळे हे बुलेटवरून सहभागी झाले होते. तर त्‍यांच्या मागील सीटवर बसून आमदार नीतेश राणे भाजपचा झेंडा हाती धरला होता.
कणकवली शहराच्या वेशीवर असलेल्‍या वागदे गोपुरी आश्रम ते वृंदावन हॉल पर्यंत महामार्गावरून निघालेल्या दुचाकी रॅलीला भाजप कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. श्री. बावनकुळे हे कुडाळ येथून दुपारी बारा वाजता कणकवलीत दाखल झाले. त्‍यांच्यासोबत आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, जिल्‍हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संजना सावंत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दुचाकी रॅलीत सहभागी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com