
लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीसाठी चिपळुणातील चिदानंद तपस्वी यांनी पाच रुपयांची देणगी पाठवली होती.
या तपस्वींचे आभार टिळकांनी मानले होते...
लोकमान्यांच्या 'या' पत्राची होतेय शताब्दी...
चिपळूण (रत्नागिरी) : लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीसाठी चिपळुणातील चिदानंद तपस्वी यांनी पाच रुपयांची देणगी पाठवली होती. देणगी मिळाल्यानंतर टिळकांनी तपस्वी यांना आभाराचे पत्र पाठवले. त्या पत्राला उद्या (ता. १३) शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. येथील लोकमान्य टिळक वाचनालयाने ऐतिहासिक पत्राचा हा ठेवा जतन केला आहे.
कै. विलास गोगटे यांचे तपस्वी हे आजोबा. त्यांच्याकडे मिळालेले हे पत्र लोटिस्माच्या वस्तुसंग्रहालयात ठेवले आहे. याबाबत माहिती देताना लोटिस्माचे अध्यक्ष अरुण इंगवले म्हणाले, शंभर वर्षापूर्वी चिपळुणातील चिदानंद तपस्वी (गोगटे) हे भिक्षेतून मिळणाऱ्या पैशातून सामाजिक कार्य करायचे.
हेही वाचा- कोकण कृषी विद्यापीठात तब्बल एवढे विद्यार्थी घेणार पदवी...
होमरूल फंडासाठी भिक्षेतून मिळणारे पाच रुपये
ते लोकमान्य टिळकांना खूप मानायचे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा आणि लोकमान्यांच्या राष्ट्रीय कार्यात जितकी मदत करता येईल तेवढी करायची हा त्यांचा बाणा. इंग्रजांच्या विरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळ सुरू केली. या चळवळीसाठी फंड व इतर यंत्रणा उभी करणे सुरू झाले. त्यावेळी चिदानंद तपस्वी यांनी भिक्षेतून मिळणारे पाच रुपये लोकमान्य टिळकांच्या होमरूल फंडासाठी पाठवले होते. शंभर वर्षापूर्वी पाच रुपयाला फार मोठी किंमत होती. त्यामुळे तपस्वी यांची देणगी मिळाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्यांना १३ फेब्रुवारी १९२० ला पत्र लिहिले. देणगी दिल्याबद्दल तपस्वींचे आभार मानताना टिळकांनी पत्रात लिहिले आहे की, आपल्यासारख्यांचे आशीर्वाद असल्यामुळे आमच्या कार्याला यश येईल हे सांगायला नको.
हेही वाचा- शिक्षकांच्या ऑनलाईन पोर्टलवर ही हवी माहिती
टिळकांचे आभार पत्र
प्रयत्न करणे आमच्या हातात आहे. ईश्वर यश देईल. आपण रोजच्या निर्वाहाच्या भिक्षेतून काढून पाच रूपयाचा प्रसाद पाठवलात. तो होमरूल लीगकडे जमा केला आहे. या देणगीची किंमत रुपयांच्या संख्येवर नाही. ही ज्या रीतीने, हेतूने आणि धार्मिक बुद्धीने गोळा झालेली आहे त्याची किंमत अनमोल आहे याची जाणीव आहे. यामुळे या देणगीचा स्वराज्य-संघातर्फे मी मोठ्या आनंदाने, अभिमानाने व भक्तीने स्वीकार करतो. आपले आशीर्वाद केळकर, खाडिलकर व इतरांना कळविले आहेत. चिपळूणला येऊन श्री परशुरामाच्या दर्शनाचा योग घडावा अशी इच्छा आहे. पूर्ण करणारा श्री समर्थ आहे.
हेही वाचा - माझ्याशी लग्न नाही केलं तर...
चिपळूणशी वेगळे नाते
लोकमान्य टिळकांचे चिपळूणशी वेगळे नाते होते. त्यांच्या जन्मापूर्वी त्यांचे वडील गंगाधरपंत टिळक चिपळुणातील प्राथमिक शाळेवर शिक्षक होते. बाळशास्त्री जांभेकर घोड्याने किंवा पालखीने चिपळुणात यायचे आणि दोघांमध्ये तासन्तास गप्पा रंगायच्या, अशी आठवण इंगवले यांनी सांगितली.