Election Results : चक्रव्यूह भेदण्यात राणे अपयशी

शिवप्रसाद देसाई
शुक्रवार, 24 मे 2019

नव पक्ष, नवे चिन्ह आणि मागच्या पराभवाची शिदोरी घेऊन लोकसभा लढवणे हे स्वाभिमानच्या दृष्टीने आव्हान होते. नारायण राणे यांनी बेधडक कार्यशैलीनुसार ते स्वीकारले; पण पूर्ण ताकद लावूनही ते चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरले. गेल्या वेळच्या पराभवापेक्षाही कणकवली मतदारसंघात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात घटलेले मताधिक्‍य महाराष्ट्र स्वाभिमानसाठी पुढच्या लढतीत डोकेदुखी ठरणार आहे.

नव पक्ष, नवे चिन्ह आणि मागच्या पराभवाची शिदोरी घेऊन लोकसभा लढवणे हे स्वाभिमानच्या दृष्टीने आव्हान होते. नारायण राणे यांनी बेधडक कार्यशैलीनुसार ते स्वीकारले; पण पूर्ण ताकद लावूनही ते चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरले. गेल्या वेळच्या पराभवापेक्षाही कणकवली मतदारसंघात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात घटलेले मताधिक्‍य महाराष्ट्र स्वाभिमानसाठी पुढच्या लढतीत डोकेदुखी ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमानचे डॉ. नीलेश नारायण राणे यांचा २०१४ च्या निवडणुकीपेक्षा मोठा पराभव केला. मुळात राणेंचा सिंधुदुर्ग हा गड मानला जातो. रत्नागिरीत शिवसेनेला मताधिक्‍य मिळणार हे उघड होते. ते लिड सिंधुदुर्गात तोडून पुढे जाता येईल असे स्वाभिमानचे स्वप्न होते. या निकालाने ते उध्वस्त झाले. याचा मोठा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानच्या मनोधैर्यावर होण्याची शक्‍यता आहे. 

नारायण राणे यांची आतापर्यंतची कारकीर्द धडाकेबाज निर्णयांनी भरलेली आहे. १९९० पासून कोकणाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या राणेंसाठी २०१४ पर्यंत सगळे निर्णय अंतिम विजयाकडे नेणारे होते. नंतर मात्र चित्र बदलले. त्यावर्षीच्या लोकसभेत डॉ. नीलेश राणे यांचा झालेला पराभव, त्या पाठोपाठ विधानसभेत स्वतः राणेंना पत्करावी लागलेली हार हे अनुभव पाठिशी असतानाही त्यांनी वांद्रे येथील विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. तेथे पराभव झाला. यानंतरही त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांचा भाजप प्रवेश मात्र झाला नाही. महाराष्ट्र स्वाभिमानची स्थापना करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या पाच वर्षात त्यांचे बरेचसे राजकीय निर्णय चुकीचे ठरले. तरीही लोकसभा स्वबळावर लढण्याची घोषणा त्यांच्या या धडक कार्यशैलीला साजेशी होती. 

खरेतर हे राजकीय चक्रव्यूह होते. सर्वच परिस्थिती राणेंसाठी प्रतिकुल होती. मुळात चिपळूणपासून दोडामार्गपर्यंत सहा पैकी पाच मतदारसंघ शिवसेनेच्या वर्चस्वाखाली होते. गेल्यावेळी काँग्रेस पक्षाचा बॅनर असूनही नीलेश राणेंचा दीड लाखाच्या फरकाने पराभव झाला होता. या वेळी नीलेश राणे नवी निशाणी घेऊन लढणार होते. यातच शिवसेना आणि भाजप या सत्ताधारी पक्षांची युती झाली. हे चक्रव्यूह भेदण्यासाठी स्वाभिमानच्या नीलेश राणे, नितेश राणे आणि स्वतः राणेंनी पूर्ण ताकदीने डावपेच आखले पण ते फोल ठरले. 

मुळात राणेंनी घेतलेल्या शिवसेनेला विरोध आणि भाजपला पाठिंबा या भूमिकेमुळे मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मोदींना मानणारी मते उघड युती असलेल्या शिवसेनेकडे गेली. मात्र मोदींना विरोध असलेली मते मिळवण्याची संधी मात्र त्यांनी गमावली. पक्षाचे चिन्ह पोचवण्यासाठीही त्यांना कमी कालावधी मिळाला.

स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला; पण राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह किंवा धोरण याचे पाठबळ नसल्याने त्यांना मतदारांचे समाधान करता आले नाही. यामुळे हा प्रचार ‘रोबोटीक’ ठरला.  इतक्‍या सगळ्या प्रतिकुल स्थितीत विजयापर्यंत जाण्यासाठी सक्षम संघटनेची गरज होती. मात्र रत्नागिरीसह सिंधुदुर्गातही काही भागात याचा अभाव होता. अशा स्थितीत स्वाभिमानने शिवसेनेच्या मित्र पक्षातील तसेच निवडणूक प्रक्रियेत नसलेल्या पक्षांमधील काही नेते, कार्यकर्ते यांचा छुप्या पद्धतीने वापर करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी, मनसे आणि भाजपमधील काही नेते स्वाभिमानच्या प्रचारकाळात संपर्कात असल्याची चर्चा होती. २००९ च्या निवडणुकीत राणेंनी हा पॅटर्न यशस्वी करून विजय मिळवला होता. यावेळी मात्र भाजपकडे नुसता मॅसेज देवून मते फिरवण्याची ताकद असलेल्या नेत्यांची कमतरता होती. राष्ट्रवादीनेही मते फिरवण्यापेक्षा शांत राहाणे पसंत केले. खासदारांनी किती विकास केला हा मुद्‌दा गौण ठरला. उलट स्वाभिमान आणि शिवसेना उमेदवारांमध्ये तुलना झाली व जनसंपर्काच्या जोरावर विनायक राऊत सरस ठरले. मोदी कार्डसुध्दा सेनेला फायदा देणारे ठरले. 

विधानसभा मतदारसंघवार विचार केल्यास कणकवली वगळता इतर ठिकाणी स्वाभिमान मताधिक्‍य मिळवू शकला नाही. सायंकाळी उशिरा मतदार संघवार उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात शिवसेनेने ४२ हजार २२४ मताधिक्‍य मिळवले. गेल्यावेळच्या तुलनेत हे मताधिक्‍य कमी असले तरी स्वाभिमानला अपेक्षित मते मिळाली नाहीत. कणकवली हा स्वाभिमानचा बालेकिल्ला. तेथून त्यांना किमान ४० हजाराचे मताधिक्‍य अपेक्षित होते. गेल्या विधानसभेतील निकाल आणि आमदार नीतेश राणे यांनी केलेली कामे लक्षात घेता ही अपेक्षा अवास्तवही नव्हती. प्रत्यक्षात येथे राणेंना १० हजार ७४५ चे मताधिक्‍य मिळाले. 

कुडाळ मतदारसंघातील मालवण तालुक्‍यात स्वाभिमानचे चांगले बळ होते. शिवाय पारंपरिक मच्छिमारांची मते त्यांच्याकडे वळण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. काही फेऱ्यांमध्ये स्वाभिमानने मताधिक्‍यही मिळवले. मात्र प्रत्यक्षात १५ हजार १३१ इतके अंतिम मताधिक्‍य शिवसेनेला मिळाले. येथेही स्वाभिमानला किमान १५-२० हजाराच्या मताधिक्‍याची अपेक्षा होती. सावंतवाडी हा केसरकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्यावेळी येथून ४१ हजार ६२१ इतके सेनेकडे मताधिक्‍य होते. यावेळी केसरकर यांच्याबद्‌दल मतदारसंघात संपर्काच्या मुद्‌द्‌यावर नाराजी असल्याची चर्चा होती.तेथे स्वाभिमानला बरोबरीची लढत अपेक्षित होती. प्रत्यक्षात २७ हजार ९५ इतके शिवसेनेला मताधिक्‍य मिळाले. हे केसरकर यांच्यासाठीही विचार करायला लावणारे आहे. 

एकूणच लोकसभेचे हे निकाल शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध करणारे ठरले. असे असले तरी राणे समर्थकांची मते दुसऱ्या क्रमांकाची असल्याचे यातून स्पष्ट झाले. काँग्रेस व इतर पक्ष यात कुठेही स्पर्धेत दिसले नाहीत. यामुळे विधानसभेत युती झाल्यास त्यांना शह देण्यासाठी स्वाभिमानला पराभवातून धडा घ्यावा लागणार आहे. 

राणे पॅटर्न अजूनही सक्रियच
लोकसभा निवडणुकीचा निकाल स्वाभिमानच्या विरोधात गेला असला तरी यामुळे राणेंचे राजकारण संपले, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कोकणच्या आतापर्यंतच्या इतिहासात पक्षाचे पाठबळ नसताना व्यक्‍तीकेंद्री मतदान झाल्याचे मोठे उदाहरण नाही. स्वाभिमान हा पक्ष राणेंच्या इमेजमुळे उभा आहे. त्याच्या जोरावर डॉ. नीलेश राणे यांना मिळालेली २ लाख ६९ हजार २३७ मते हा मोठा आकडा आहे आणि तो केवळ राणेंना मानणारा त्यांचा वैयक्‍तिक करिष्मा सांगणार आहे. 

लोकसभा २०१९
विधानसभा    निलेश राणे    विनायक राऊत    मताधिक्‍य
सावंतवाडी    ४०५७३    ६७६६८    २७०९५
कुडाळ    ५४८६२    ६९९९३    १५१३१
कणकवली    ६७५६३    ५६८१८    १०७४५ (नीलेश राणेंचे लिड)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 election result Ratnagiri Sindhudurg constituency