Loksabha 2019 : गृहकलह तटकरेंसाठी ठरणार अडचण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

चिपळूण - रायगड लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहणार आहे. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री व शिवसेनेचे नेते अनंत गीते मैदानात असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे कडवे आव्हान असणार आहे. 

चिपळूण - रायगड लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहणार आहे. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री व शिवसेनेचे नेते अनंत गीते मैदानात असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे कडवे आव्हान असणार आहे. 

लोकसभेत शिवसेनेचे 18 खासदार आहेत. यांतील एकमेव अनंत गीते केंद्रात मंत्री आहेत. "मातोश्री'चे अत्यंत विश्‍वासू म्हणून त्यांची ओळख असल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांच्यावरच विश्‍वास टाकला. सेनेतील पहिल्या पसंतीचा खासदार ही त्यांची ओळख अनेकांच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा ठरत आहे. त्यामुळे भाजपच्या मदतीने शिवसेनेत गीतेंच्या विरोधी फळी तयार होऊ लागली आहे. सुनील तटकरेंनी गीतेंचा पराभव केला, तर राष्ट्रवादी आणि सेना विरोधकांसाठी हा मोठा विजय असणार आहे.

मागील निवडणुकीत मोदी लाट असतानाही तटकरे यांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तटकरेंवर घराणेशाही, भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, तरीही ते लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले आणि काठावर पराभूत झाले. पक्षांतर्गत गटबाजीमुळे तटकरे यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याची चर्चा होती. यावेळी त्यांच्या उमेदवारीलाही पक्षांतर्गत विरोध झाला होता; मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नाराजांची मनधरणी केली. शेकाप, मनसे आणि इतर छोट्या पक्षांची साथ मिळवण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली आहे; मात्र गृहकलह त्यांच्यासाठी अडचणीचा ठरणार आहे. पक्षातून त्यांना किती पाठबळ मिळते, यावर पुढील गणिते ठरणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Raigad constituency special