रायगड : पाली-खोपोली मार्गावर लक्झरी बस पलटी

अमित गवळे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पाली (रायगड) : वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरु अाहे. येथील असुरक्षीत कामामुळे अपघाती घटनांत वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.२४) रात्री या मार्गावर मजरे जांभूळपाडा हद्दीत लक्झरी बस रस्त्याचा अंदाज न आल्याने चार ते पाच फुट खोल खोदलेल्या खड्ड्यात पलटी झाली. ह्या लक्झरी बस मध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात चालक जखमी झाला आहे.

पाली (रायगड) : वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरु अाहे. येथील असुरक्षीत कामामुळे अपघाती घटनांत वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.२४) रात्री या मार्गावर मजरे जांभूळपाडा हद्दीत लक्झरी बस रस्त्याचा अंदाज न आल्याने चार ते पाच फुट खोल खोदलेल्या खड्ड्यात पलटी झाली. ह्या लक्झरी बस मध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात चालक जखमी झाला आहे.

रस्त्याचे काम सुरु ठेऊन वाहतुकीसाठी साठी तयार केलेला रस्ता सात दिवसाच्या आत सुरक्षित न केल्यास लयभारी आदिवासी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत लाड यांनी दिला आहे. या मार्गावर सात दिवसात हा सहावा अपघात आहे. वाकण ते पाली फाटा हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे सुरु असल्याचे काम हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. एकीकडे रुंदीकरणाचे काम करण्यासाठी मूळ डांबरी रस्त्याचे खोदकाम होत आहे. तर वाहतुकीसाठी बनविला जाणारा रस्ता मातीचा आहे. फक्त माती टाकून ओबडधोबड रस्ता तयार केला असल्याने वाहन चालक या मातीच्या रस्त्यावर वाहन नेण्यासाठी घाबरतात. तसेच एका बाजुने रस्ता पुर्णपणे खोदलेला आहे. तेथे सुरक्षिततेसाठी संरक्षक कठडे (बॅरिगेट्स) किंवा पत्रे लावलेले नाहीत.त्यामुळे दिवसा व जास्त प्रमाणात रात्रीच्या वेळेस अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या मार्फत होत असून हे काम ज्या कंत्राटदारांना दिले आहे. त्यांनी वाहतुक व रस्त्याची सुरक्षितता न बघता फक्त नवीन काम जोमाने सुरु ठेवले आहे. मोटारसायकस्वार तर या मार्गावरुन जिव मुठीत घेवून प्रवास करत आहेत. याबाबत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या लेखी पत्राला कंत्राटदार केराची टोपली दाखवत आपले काम सुरु ठेवले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोकलेन व जेसीबी द्वारे उत्खनन करून रस्ता बनविला जात असल्यामुळे प्रचंड प्रमाणात असलेली वाहतूक आणि अवजड वाहने यांना जाण्यासाठी पुरेसा व योग्य रस्ता नसल्यामुळे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. ओव्हरलोड व अवजड वाहतूक देखील अपघाती घटनांना कारणीभूत ठरत आहे. खोदलेल्या रस्त्यावर धोकादायक फलक, सुरक्षा पट्टी आणि वाहतुकीचा रस्ता अशा अनेक बाबी पूर्ण करण्यात याव्यात यासाठी एमएसआरडीसी आणि कंत्राटदार यांना वेळोवेळी लेखी पत्र देऊन सुद्धा सुरक्षेची काळजी घेत नाही. पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी तातडीने उपाययोजना करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करणेत येईल. असे पाली सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांनी सांगितले.

पाली खोपोली राज्य महामार्गावरून सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून ज्या ठिकाणी रस्त्याचे व मोऱ्यांचे खोदकाम झालेले आहे. त्यावरील रेडियमच्या पट्ट्या बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या आहेत. तर काही ठिकाणी पट्ट्याच नाही अशी स्थिती आहे. तरी याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांनी वाहतुकीचा रस्ता हा सुस्थितीत करून द्यावा अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल. 

- प्रशांत लाड, अध्यक्ष-लयभारी आदिवासी सामाजिक विकास संस्था

Web Title: luxury bus fallen on pali khopoli road raigad